मालवण : पंधरवड्यापूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू पिकाचे नुकसान झाले आहे. मालवण तालुक्यात आंबा, काजूचे मोठे क्षेत्र आहे. अवकाळी पावसामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले आहेत. कृषी विभागाने पंचनामा करताना तालुक्यातील एकही बाधीत शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेणे महत्त्वाचे आहे, अशी सूचना माजी सभापती राजेंद्र प्रभूदेसाई यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत केली. मालवण पंचायत समितीची विशेष मासिक सभा शुक्रवारी सभापती सीमा परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली मठ बुद्रुक येथे ग्रामपंचायत सभागृहात झाली. यावेळी उपसभापती देवानंद चिंदरकर, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, सदस्य राजेंद्र प्रभूदेसाई, छोटू ठाकूर, प्रसाद मोरजकर, उदय दुखंडे, चित्रा दळवी, भाग्यता वायंगणकर, सुजला तांबे, श्रद्धा केळूसकर, हिमाली अमरे तसेच अधिकारी उपस्थित होते. वर्षातून एकदा तालुक्यातील ग्रामीण भागात आयोजित करण्यात येणारी पंचायत समितीची बैठक मठबुद्रुक येथे घेण्यात आली. यावेळी मठबुद्रुक ग्रामपंचायतीच्या नूतन सभागृहाचे उद्घाटन सभापती परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मठबुद्रुक ग्रामपंचायत व गावातर्फे सरपंच अक्षता बोंबळकर, उपसरपंच नीलेश बाईत व राजू परुळेकर यांनी सर्व पंचायत समिती सदस्य व अधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी केला. प्रसाद मोरजकर यांनी कृषी विभाग तसेच इतर विभागातर्फे करण्यात येणाऱ्या कामांविषयी सदस्यांना माहिती दिली जात नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. विशिष्ट भागातील एखाद्या कामाच्या निधीस मंजुरी तसेच प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली तरी त्या भागातील संबंधित पंचायत समिती सदस्यास पूर्व माहिती दिली जात नाही असे सांगितले. पराडकर यांनी संबंधित कामांची पूर्ण माहिती सदस्यांना देण्यात यावी असे सांगितले. यावेळी प्रभूदेसाई यांनी तालुक्यातील महिला बचतगटांना व्यवसाय उभारणीसाठी कमी व्याजदरात बँकांकडून कर्ज उपलब्ध व्हावे अशी सूचना मांडली. यावेळी पराडकर यांनी संबंधित बाब बँकांच्या अधिकारात असून त्यासाठी प्रस्ताव तयार करुन डीआरडीएमार्फत शासनाकडे पाठवू असे सांगितले. तर उदय दुखंडे यांनी तालुक्यातील माध्यमिक शाळांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णत: सुटलेला नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)पंचनामे त्वरित करा : सीमा परुळेकरमालवण पंचायत समितीच्या मासिक सभेत माजी सभापती राजेंद्र प्रभूदेसाई यांनी केलेल्या सूचनेवर राजेंद्र पराडकर यांनी शासनाच्या आदेशानुसार कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांना नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत, असे सांगितले. सभापती सीमा परुळेकर यांनी पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना कृषी अधिकाऱ्यांना केल्या.
नुकसानीबाबत दक्षता बाळगा
By admin | Updated: March 20, 2015 23:21 IST