प्रसन्न राणे - सावंतवाडी--सर्वसामान्य जनतेला त्रास देणाऱ्या नरकासूर या राक्षसाचा वध श्रीकृष्णाने केला होता. हा दिवस नरकचतुर्दशी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी ग्रामीण भागासह शहरातही नरकासूराच्या लहान-मोठ्या प्रतिमांचे दहन केले जाते. नरकचतुर्दशी काही दिवसांवरच येऊन ठेपल्याने नरकासूर बनविण्याच्या कामाला आता वेग आला असून युवा वर्गामध्ये उत्साह दिसून येत आहे. नरकासुराचा श्रीकृष्णाने वध केल्याने दीपावलीच्या पहाटे नरकासुराचे दहन केले जाते. ही परंपरा आजही कायम असून हा दिवस नरकचतुर्दशी म्हणून साजरा केला जातो. पूर्वी सावंतवाडी शहरात हातावरच्या बोटावर मोजण्याइतक्याच नरकासुराच्या प्रतिमा तयार केल्या जात असत. मात्र, आता सावंतवाडीत अनेक ठिकाणी विविध प्रकारच्या नरकासुराच्या प्रतिमा युवक करत असतात. त्यासाठी मंडळांकडून आर्थिक मदतही केली जाते. मंडळ नसल्यास युवक परिसरातील घराघरातून काही वर्गणी गोळा करुन नरकासूर तयार करण्याचा खर्च भागवितात. नरकासूर तयार करणे म्हणजे एक कलाच आहे. या कलेला वाव देण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून विविध भागात ‘नरकासूर स्पर्धा’ आयोजित केल्या जातात. सावंतवाडी तालुक्यातही अशा स्पर्धेचे आयोजन केले जाते. सावंतवाडी शहरासह तालुक्यातील अनेक युवा मंडळे आकर्षक आणि भव्य नरकासूर तयार करून या स्पर्धेत सहभागी होतात. या स्पर्धेतील एकापेक्षा एक सरस कलाकृतींमुळे क्रमांक निवडतानाही परीक्षकांची चांगलीच कसरत होते. या अनुषंगाने सावंतवाडीतील अनेक मंडळे यावर्षीही स्पर्धेत उतरण्यास सज्ज झाली आहेत. शहरात विविध ठिकाणी नरकासूर तयार करण्यात युवा मंडळी मग्न झाली आहे. नरकासूर तयार करण्यात तरुण वर्गाचा मोठा प्रतिसाद असतो. रात्रंदिवस मेहनत करून नरकासूर तयार के ला जातो. बांंबू आणि लाकडाच्या सहाय्याने सांगाडा तयार करून नंतर त्यात गवत आणि फटाके भरून नरकासूर तयार केला जातो. मात्र, अलीकडच्या काळात लोखंडी वेल्डिंगच्या सहाय्याने एकच कायमस्वरुपी सांगाडा बनवण्याचीही नवीन पद्धत रूळत चालली आहे. शहरातील मंडळे लागली कामालाग्रामीण भागात मात्र आजही बांबू आणि लाकडी वस्तू, कणके यांच्या सहाय्याने पारंपरिक पद्धतीने नरकासूर तयार केले जातात. या कामाला आता वेग आला आहे. यासाठी वर्गणी, फंड याद्वारे आर्थिक बाजू सांभाळली जाते. सावंतवाडीमधील अनेक नरकासूर मंडळांपैकी वटसावित्री मंडळ, माठेवाडा मित्रमंडळ, चितारआळी मित्रमंडळ, गोठण मित्रमंडळ, भटवाडी मित्रमंडळ, सालईवाडा मित्रमंडळ, सबनीसवाडा मित्रमंडळ, वैश्यवाडा मित्रमंडळ ही मंडळे स्पर्धांमध्ये नेहमीच आघाडीवर असतात. याव्यतिरिक्तही बाळगोपाळही आपल्या मजेकरिता जमतील तशा नरकासुरांच्या प्रतिमा तयार करुन याचा आनंद लुटताना दिसत आहेत.
‘नरकासूर’ स्पर्धेचे आकर्षण
By admin | Updated: October 17, 2014 22:51 IST