कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टाटा मेटॅलिकसारखा मोठा उद्योग बंद पडल्यामुळे कुडाळ एमआयडीसीमध्ये एखादा मोठा उद्योग आणून त्यासोबत छोटे पूरक उद्योग आणून रोजगार मिळवून देण्यासाठी युती शासन प्रयत्नशील आहे, असे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथील उद्योजकांना दिले. उद्योजकांच्यावतीने दादा चव्हाण यांनी मंत्र्यांकडे अनेक समस्या मांडल्या.ज्या समस्या जिल्हा पातळीवर सुटतील, त्या तातडीने सोडविण्यात येणार असून, या एमआयडीसीला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यात येईल. तसेच स्थानिक लघू उद्योजकांनाही प्रोत्साहन देण्यात येईल. काही उद्योजकांनी बांबूवर प्रक्रिया करणारा उद्योग आणल्यास बांबूला चांगला दर मिळेल, तसेच रोजगारही उपलब्ध होईल, असे सांगितल्यावर उद्योगमंत्री देसाई यांनी त्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, आपणा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे सांगितले. संपूर्ण राज्यात जवळपास वीस लाख रोजगार उपलब्ध करून देण्यात येतील. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यावरही आपले विशेष लक्ष असेल. ही एमआयडीसी काही कालावधीतच तुम्हाला उद्योगधंद्यांनी गजबजलेली दिसेल, असे आश्वासन दिले.येथील आजारी उद्योगही सुरू करण्याच्या दृष्टीने विचार केला जाईल. न पेक्षा त्या केवळ जमिनींची देवाण-घेवाण करून धंदा करण्यासाठी जमिनी घेतल्या असतील, तर त्या जमिनी ताब्यात घेण्यात येतील व नवउद्योजकांना देण्यात येतील. अधिकाऱ्यांनीही चालढकल करू नये. उद्योजकांना सहकार्य करावे, अन्यथा अधिकाऱ्यांवरही सेवा अधिकाराचा वापर केला जाईल. अधिकाऱ्यांनीही ज्या कामासाठी आपली नेमणूक झाली आहे, त्याला न्याय दिला पाहिजे. (प्रतिनिधी)
सिंधुदुर्गात मोठा उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील
By admin | Updated: December 29, 2014 00:11 IST