रत्नागिरी : अन्नसुरक्षा योजना सुरू झाल्यापासून ‘एपीएल’धारकांना शासनाकडून सापत्नभावाची वागणूक मिळत असून, पुन्हा आता दोन महिने हे कार्डधारक धान्यापासून वंचित आहेत.केंद्र सरकारची राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना फेब्रुवारी २०१४पासून सुरू झाली. या योजनेचा प्राधान्य गट तसेच अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना नियमित सुरू आहे. मात्र, ‘एपीएल’धारकांना धान्य पुरवठा अनियमित केला जात आहे. ही योजना सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांनंतर म्हणजेच मे महिन्यात एपीएलधारकांना धान्यपुरवठा करण्यात आला होता. त्यानंतर धान्य पुरवठा नियमित होईल, असे वाटले होते. मात्र, अजूनही धान्य पुरवठा नियमित झालेला नाही.जिल्ह्यात ९८,१९३ एपीएल शिधापत्रिकाधारक आहेत. त्यांना प्रतिशिधापत्रिका धान्य देण्यात येते. सध्या जिल्ह्यासाठी ५६४ मेट्रिक टन गहू आणि ४६१ मेट्रिक टन तांदूळ इतके नियतन मंजूर आहे. गेल्या १ फेब्रुवारीपासून अन्नसुरक्षा योजनेची अंमलबजावणी करण्यात आली असली तरी एपीएलधारकांवर मात्र, सतत अन्याय होत आला आहे. ही योजना सुरू झाल्यानंतर तब्बल ३ महिने एपीएलधारकांंना धान्य मिळाले नव्हते. त्यानंतर मे महिन्यात पुन्हा धान्य देण्यात आले. जून, जुलै महिन्याचा धान्यपुरवठाही एपीएलधारकांना करण्यात आला होता. त्यानंतर आॅगस्ट महिन्याचे नियतन मंजूर झाले. ते १५ आॅगस्टपर्यंत पुण्यातील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात येणे गरजेचे होते. मात्र, ते २८ आॅगस्टला आल्याने महामंडळाने ते धान्य नाकारले होते. धान्य परत गेल्याने एपीएलधारकांना आॅगस्टच्या धान्यापासून वंचित राहावे लागले. मात्र, त्यानंतर सप्टेंबर आणि आॅक्टोबरचे नियतन मंजूर झाल्याने या शिधापत्रिकाधारकांना तात्पुरता दिलासा मिळाला होेता. आता नोव्हेंबर आणि त्यानंतर डिसेंबरही गेला तरी अजूनही एपीएलधारकांना धान्याचे वितरण करण्यात आलेले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
‘एपीएल’धारक पुन्हा दोन महिने धान्यापासून वंचित
By admin | Updated: January 3, 2015 00:10 IST