कणकवली : भाजपा पक्षांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ५ आॅक्टोबरपासून पुढील महिनाभरात गावपातळीवरील स्थानिय समित्यांच्या निवडणुका होत असून डिसेंबरच्या मध्यावर जिल्हा कार्यकारिणीची निवडणूक होणार आहे. लोकशाही पद्धतीने पक्षांतर्गत निवडणुका होत असून कुठली घराणेशाही नसलेला एकमेव पक्ष असल्याचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी येथील पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी प्रभाकर सावंत, तालुकाध्यक्ष शिशिर परूळेकर उपस्थित होते. काळसेकर पुढे म्हणाले की, चालू वर्ष भाजपातील संघटनात्मक निवडणुकीचे वर्ष आहे. पक्षांतर्गत लोकशाही टिकवलेला भाजप हा एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे. आतापर्यंत सदस्य नोंदणी अभियानांतर्गत १०.७५ कोटी सदस्यांसह जगातील क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. भाजपाचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असून जिल्ह्यासाठी प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू यांची निवडणूक अधिकारी म्हणून तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सरचिटणीस चारूदत्त देसाई यांची नेमणूक करण्यात आली आहे. तालुकानिहाय निवडणूक अधिकारी नेमण्यात आले आहेत. दोडामार्ग चंद्रशेखर देसाई, सावंतवाडी पुखराज पुरोहित, वेंगुर्ले साईप्रसाद नाईक, मालवण विलास हडकर, कुडाळ नीलेश तेंडुलकर, कणकवली राजश्री धुमाळे, वैभववाडी संजय रावराणे तर देवगडसाठी नरेंद्र भाबल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुका स्तरावरच्या निवडणुकांपूर्वी ५ आॅक्टोबरपूर्वी सक्रीय सदस्य नोंदणी करायची आहे. जिल्हास्तरावरून या सदस्यांना मान्यता दिली जाणार आहे. ज्या कार्यकर्त्याने १५ दिवस पूर्ण वेळ काम करण्यासह किमान १०० प्राथमिक सदस्य केले आहेत त्याला सक्रीय सदस्य म्हणून मान्यता देण्यात येईल. ५ आॅक्टोबर ते ५ नोव्हेंबर स्थानिय समित्यांच्या निवडणुका होणार असून त्या- त्या गावातील प्राथमिक सदस्य स्थानिय समिती अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची निवड करतील. या समितीत महिला आघाडी व युवक आघाडीचे सदस्य निवडण्यात येतील. नोव्हेंबर अखेरीस तालुका स्तरावरील निवडणुका होणार आहेत. यासाठी स्थानिय समितीचा अध्यक्ष मतदार असेल. आॅक्टोबर महिन्यात प्राथमिक व सक्रीय सदस्यांसाठी प्रशिक्षणे होणार आहेत. सक्रीय सदस्यांमधून तालुकानिहाय आठ सदस्य जिल्हा निवडणूक प्रक्रियेत भाग घेतील. ज्या तालुक्यात ५० टक्केपेक्षा कमी स्थानिय समित्या होतील. त्या तालुक्याची समिती गठीत झालेली नाही असे गृहीत धरून तालुका प्रक्रियेतून बाद होणार आहे, असे काळसेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
भाजपांतर्गत निवडणूक कार्यक्रम जाहीर
By admin | Updated: September 27, 2015 00:19 IST