: सावंतवाडीत १९६० च्या दशकात शिवरामराजे भोसले यांनी ७५ हजार रूपयांवर स्थापन केलेल्या पंचम खेमराज महाविद्यालयात ५४ वर्षांनी अंतर्गत वादाची ठिणगी पडली. मात्र, या प्रकारानंतर संपूर्ण सावंतवाडीवासीयांनी एकजूट दाखवत राजघराण्याच्या अस्मितेवर घालण्यात आलेला घाला म्हणजे आपल्या घरावर घाला, असे म्हणत एकमुखी पाठिंबा जाहीर केला आहे.सावंतवाडीत रत्नागिरी शिक्षण प्रसारक मंडळाचे पंचम खेमराज महाविद्यालय असून या महाविद्यालयाचा आदर्श हा पूर्ण कोकणात आहे. मात्र, यात संस्थेत गेल्या काही महिन्यांपासून धुमसणारा वाद गुरूवारी अचानक बाहेर आला. एम. डी. देसाई तसेच पी. एफ. डॉन्टस यांच्यासह राजमाताच्या कन्या शिवप्रिया भोगले या पतीसह संचालक मंडळाच्या कार्यालयात आल्या. त्यानंतर जुन्या कार्यकारी मंडळाला शह देत नवीन मंडळ स्थापन करण्यात आले. या मंडळामध्ये कार्याध्यक्ष म्हणून शिवप्रिया भोगले व उपाध्यक्ष महेश सारंग, राजू गावडे, मंदार कल्याणकर, चंद्रकात जाधव आदींची निवड करण्यात आली. हा नवीन कार्यकारिणीचा चेंज रिपोर्ट लवकरात लवकर धर्मादाय आयुक्तांना सादर करू, असे यावेळी जाहीर करण्यात आले.सारंगानी पद सोडावेसावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती व काँग्रेसचे गटनेते यांना या नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्ष पद देण्यात आले आहे. यावर काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब यांनी आपली भूमिका जाहीर केली असून आमचे नेते नारायण राणे यांनी ठामपणे संस्थानच्या मागे उभे राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रसंगी संस्थानसाठी रस्त्यावर उतरू तसेच उपाध्यक्ष बनलेल्या सारंग यांनी काँॅग्रेस पक्ष सोडावा अन्यथा पद सोडावे, अशी भूमिका घेतली.महाविद्यालयात घडलेल्या प्रकाराची चर्चा संपूर्ण सावंतवाडी शहरात पसरल्यानंतर शहरातील सर्वपक्षीय नागरिक चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी याबाबत आपली भूमिका मांडली. यात नकुल पार्सेकर यांनी सांगितले की, घडलेला प्रकार निषेधार्थ असून कोणीही याचे समर्थन करणार नाही. तसेच हा प्रकार कोणी केला त्यांची कीव करावी तेवढी थोडी आहे, असे सांगत आम्ही या विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याची भूमिका घेतली आहे. यापुढे कोण संस्थानाकडे दादागिरी करत असतील तर माजी विद्यार्थी तसेच सावंतवाडीतील नागरिक म्हणूनही राजघराण्याच्या पाठिशी आम्ही ठाम असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी शिवाजी सावंत, रूपेश राऊळ, यशवंत देसाई, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, नकुल पार्सेकर, अॅड. सुभाष पणदूरकर, महेश खानोलकर, देवेंद्र टेमकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर, किर्ती बोेंद्रे, अनारोजीन लोबो, शुभांगी सुकी आदींनी भूमिका मांडली. पंचम खेमराज महाविद्यालयाच्या हॉलमध्ये लवकरच राजघराण्याच्या प्रेमींची तसेच माजी विद्यार्थी आदींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. याची तारीख लवकर जाहीर करू, असे नकुल पार्सेकर म्हणाले. (प्रतिनिधी)चुकीचा प्रकार सावंतवाडीत घडू देणार नाही : केसरकरआमचा विरोध संस्थेबद्दल चुकीची माहिती देऊन नात्यात फूट पाडणाऱ्यांबाबत आहे. हा विषय राजघराण्यात एकत्र बसून मिटला गेला पाहिजे होता. पण काहींनी तो वाढवला आहे, असे सांगत मी ठामपणे राजघराण्याच्या मागे उभा राहणार असून, कोण तरी बाहेरून येवून शिक्षण संस्था ताब्यात घेत असेल तर कोणी गप्प बसू नये. सर्वांनी एकत्र यावे, आमच्या कुटुंबाचे राजघराण्याशी असलेले संबध लक्षात घेता कदापि चुकीचा प्रकार सावंतवाडीत घडू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला‘तो’ प्रकार हाणून पाडू : बबन साळगावकरकोणी आमच्या अस्मितेवरच हात घालत असेल तर आम्ही हे सहन करणार नाही. शिक्षणक्षेत्राचे नुकसान होऊ देणार नाही. महाविद्यालयाबाबत घडलेला प्रकार चुकीचा असून सावंतवाडीची जनता अशांना माफ करणार नाही. प्रसंगी रस्त्यावर उतरेल, असे मत यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मांडले.संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू नये : उपरकर सावंतवाडीतीलच नव्हे तर कोकणातील हे एकमेव कॉलेज असून याचे कोण राजकारण करून संस्था ताब्यात घेत असतील तर कोण खपवून घेणार नाही. आम्ही राजघराण्याच्या मागे ठामपणे उभे राहणार असून प्रसंगी मनसे रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा इशारा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला आहे. यावेळी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.कॉलेज विकण्याचा घाट : पी. एफ. डॉन्टसपी. एफ. डॉन्टस यांनी राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच डी. टी. देसाई यांनी तीनशे सभासद केले आणि आता कॉलेज विकण्याचा घाट घालण्यात येत आहे. कोल्हापूर येथील काहीजण हे कॉलेज विकत घेत आहेत, असा आरोप केला. मात्र, पत्रकारांनी कोण विकत घेणार याबाबत विचारले असता, सध्या आमच्याकडे कागदपत्रे नाहीत असे सांगितले. तसेच संस्थेत तुम्ही होता मग राजमातांवर आरोप कसे, यावर ते आम्हाला अधिकारच नव्हते. आम्ही सहीचे मानकरी होतो, असे म्हणाले.संस्था वाचवू : देसाईकळणे येथील सभासद दक्षिण रत्नागिरी शिक्षण प्रसारक मंडळावर चालत असतील तर आम्ही केलेले सभासद का चालत नाहीत. आम्ही संस्था ताब्यात घेणारे नसून संस्था उभी करणारे आहोत, असे मत महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक डी. टी. देसाई यांनी व्यक्त केले. तसेच सर्वांनी एकत्र येऊन संस्था वाचवूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.आपण एक होऊया : सावंतबापूसाहेब महाराजांची पुण्याई म्हणून आपण सर्व जण एक असून जर राजघराण्याच्या अस्मितेवर कोण घाला घालत असतील तर आपण एक होऊया, असे आवाहन सदासेन सावंत यांनी केले आहे.लढाई सर्वांनी लढली पाहिजे : पेडणेकरराजघराण्यावर कोण घाला घालत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. संस्था ताब्यात घेण्याचे हे कारस्थान कोण रचत आहे आणि त्याचा पूर्व इतिहास काय आहे. हा आता येथील शिक्षणप्रेमींनी ओळखावा व यांना जशास तसे उत्तर द्यावे असे मत सभापती गुरूनाथ पेडणेकर यांनी मांडले.
सावंतवाडीत सर्वपक्षीय एकवटले
By admin | Updated: November 28, 2014 00:10 IST