वेंगुर्ले : माता मारिया ही प्रीतसेवेची व नम्रतेने भारलेली माता होती. तिचा आदर्श सर्व ख्रिस्ती बंधुभगिनींनी घेऊन बंधुभावाने वागावे, असा संदेश सिंधुदुर्ग धर्मप्रांताचे महागुरू बिशप आॅल्विन बरेटो यांनी आजगाव येथील वेलांकनी मातेच्या जन्मोत्सव सोहळ्यात दिला. आजगाव येथील सेंट फ्रान्सिस झेविअर चर्चमध्ये गेली पंचवीस वर्षे वेलांकनी मातेची भक्ती केली जात आहे. संपूर्ण सिंधुदुुर्गवासीयांचे भक्तिस्थान असलेल्या वेलांकनी मातेचा जन्मोत्सव सोमवार ८ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेले नऊ दिवस आजगाव सेंट झेवियर चर्चमध्ये रोज सायंकाळी नोवेला प्रार्थनेस सिंधुदुर्गमधील ख्रिस्ती भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती. या नोेवेलाच्या सांगता समारोहानिमित्त खास मिस्सा प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रार्थनेत महा धर्मगुरू बिशप आॅल्विन बरेटो यांच्या प्रमुख उपस्थितीत फादर गॉलविन, फादर जॉन सालदाना, आजगाव प्रिस्ट मास्टर आंद्रू डिमेलो यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धर्मगुरू उपस्थित होते. यावेळी गॉडविन यांनी मिस्सा बलिदान अर्पण करून वेलांकनी मातेची महती व लहान ख्रिस्ती समुदायाचे महत्त्व सांगून ख्रिस्ती समाजाने संघटीत होण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. या यात्रोत्सवाच्या निमित्ताने फादर गॉडविन यांनी लिहिलेल्या धार्मिक पुस्तकाचे व ‘नवसरणी’ या मासिकास पंचवीस पूर्ण झाल्याबाबत काढलेल्या विशेषांकाचे अनावरण महाधर्मगुरू बरेटो यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बरेटो यांनी नवसरणी मासिकाचे संस्थापक संपादक आंद्रू डिमेलो व फादर गॉडविन यांचा गौरव केला. या यात्रोत्सवास वेंगुर्ले सावंतवाडी आगारातून एसटी बसेस सोडण्यात आल्या होत्या. या उत्सवास सिंधुदुर्ग तसेच गोवा येथूनही भाविक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सर्व ख्रिस्ती बांधवांनी बंधुभावाने वागावे
By admin | Updated: September 10, 2014 22:20 IST