वैभववाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पराभवामुळे जिल्ह्यातील ‘राणे फॅक्टर’ संपला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्यातील सत्तेचा प्रभावीपणे वापर करून प्रत्येक गाव सक्षम करणे त्याचबरोबर भाजपाची संघटनात्मक बांधणी भक्कम करणे एवढेच आता आमचे ध्येय आहे, असे मत माजी आमदार प्रमोद जठार यांनी येथे व्यक्त केले.भाजपा कार्यालयात आयोजित कार्यकर्ता बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, प्रमोद रावराणे, तालुकाध्यक्ष सुहास सावंत, सरचिटणीस राजेंद्र राणे, मनोहर फोंडके, उत्तम सुतार, संजय रावराणे, रंगनाथ नागप आदी उपस्थित होते.ते म्हणाले, जिल्ह्यातील पक्षाच्या पराभवाने खचून न जाता कार्यकर्त्यांनी सत्तेचा उपयोग करून विकासासाठी आवश्यक निधी गावापर्यंत नेण्याच्या दृष्टीने सध्या नियोजन केले जात आहे. त्यासाठी गाव, तालुका व जिल्हा पातळीवर संघटनात्मक पुनर्रचना केली जाणार आहे. त्यामुळे भाजपाच्या विकासात्मक कार्यपद्धतीची प्रचिती लवकरच येईल. राज्यातील विश्वासदर्शक ठरावानंतर तालुक्यातील एस. टी. स्टँड, आयटीआय इमारत, ऊस संशोधन केंद्र यासह अन्य प्रमुख विकासकामांसाठी मंत्रालयात संयुक्त बैठक आयोजित केली जाणार आहे. याबाबत नुकतीच शिक्षणमंत्री विनोद तावडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याशी चर्चाही झाली आहे, असे जठार यांनी स्पष्ट केले. माजी आमदार जठार म्हणाले, १६ ते १९ या काळात भाजपाने जिल्ह्यात प्रचार दौरा आयोजित केला आहे. हा दौरा १९ रोजी सकाळी १० वाजता वैभववाडीत होणार आहे.यावेळी जनतेने आपल्या भागातील समस्या लेखी स्वरूपात घेऊन भाजपा कार्यालयात हजर रहावे, असे आवाहन करीत यापुढे जनतेने विकासाची चिंता करणे सोडून द्यावे. (प्रतिनिधी)कोकणाला हक्काचा माणूस मिळालारेल्वेमंत्री सुरेश प्रभूंना सरकारमध्ये घेऊन कोकणचा सन्मान केला आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला भाजपाचा हक्काचा खासदार मिळाला आहे. त्यामुळे कोेकण रेल्वेचे अनेक प्रश्न तत्काळ मार्गी लागतीलच. शिवाय विविध विकास प्रकल्पांनाही चालना मिळेल. या सगळ्याचा फायदा भाजपावाढीसाठी होणार आहे असा विश्वास माजी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला.
संघटना बांधणीचे ध्येय : जठार
By admin | Updated: November 11, 2014 23:22 IST