शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शरीराचे ‘चिपाड’ झाल्यावर ना सणाचे भान राहते, ना परिस्थिती

By admin | Updated: November 2, 2015 22:30 IST

असेही दुष्टचक्र : ऊसतोड, कर्ज फेडण्यातच सरते आयुष्य; सणाला गोडधोड नव्हे, भाजी-भाकरीचीही असते पंचाईत

 नाशिक :गेल्या वर्षी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पाच-सात महिने ऊसतोड करीत राबायचे, त्यातून जुने कर्ज फिटल्यावर पुन्हा नवे कर्ज घेऊन गावाकडे जायचे... त्यावर गुजराण करीत पुढच्या वर्षी पुन्हा ऊसतोडीसाठी हजर व्हायचे... हेच दुष्टचक्र ‘त्यांच्या’ आयुष्यात अव्याहत सुरू राहते... कर्ज फेडता-फेडता आणि ऊसतोड करता-करता त्यांच्या शरीराचेच पार ‘चिपाड’ होऊन जाते... मग अशात सण साजरा करण्याचे भान राहत नाही आणि परिस्थितीही...दसऱ्यानंतर मुकादमाच्या बैलगाडीत बसून उसाच्या शेतीची वाट धरणाऱ्या आणि सकाळी सातपासून सायंकाळपर्यंत कंबरेत वाकून ऊस तोडणाऱ्या कामगारांची ही व्यथा आहे. मालेगाव, सटाणा ते थेट धुळे जिल्ह्यातून हे शेकडो आदिवासी मजूर दरवर्षी दसऱ्यानंतर निफाड, सायखेडा, चांदोरी, चापडगाव या परिसरात बायका-पोरांसह ऊसतोडीसाठी दाखल होतात. त्यांच्या ‘टोळ्या’ येण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे. घराला कुलूप लावून, फाटका संसार ट्रकमध्ये घालून आणणारी ही माणसे ऊसतोडीच्या भागातल्या मोकळ्या जागेत झोपड्या उभारून राहतात. पहाटे चारला उठून स्वयंपाक केला जातो. भल्या सकाळीच भाजी-भाकरी खाऊन सात वाजता ते कामावर हजर होतात. साधारणत: तिघा जणांची एक ‘टोळी’ असते. त्यात नवरा-बायको आणि एखाद्या मुलाचा समावेश असतो. दोघांनी कोयत्याने ऊस तोडायचा आणि बाईमाणसाने त्याची मोळी बांधायची. बैलगाडीभर ऊस तोडून झाला की, दोघा माणसांनी गाडी भरायला सुरुवात करायची आणि त्या वेळेत बाईने ऊस तोडायचा. अशी एक टोळी दिवसभरात साधारणत: तीन बैलगाड्या (तीन टन) ऊस तोडते. एक टन ऊस तोडल्यास २६० रुपये मिळतात. असा इतर टोळ्यांनी तोडलेला ऊस मिळून रोज सतरा-अठरा टनांचा ट्रक भरतो. सायंकाळी पाच वाजता काम थांबल्यावर पुरुषांनी जनावरांच्या खाण्यासाठी उपयोगात येणारी ‘बांडी’ जवळच्या गावात नेऊन विकायची. त्या पैशांतून मीठ-मिरची आणायची आणि महिलांनी संध्याकाळचा स्वयंपाक शिजवायचा. पुढचे पाच-सात महिने- म्हणजे ‘आखाजी’पर्यंत (अक्षय्यतृतीया) हेच चक्र चालू राहते. मोसम संपला की, सर्वांचा हिशेब केला जातो. साखर कारखान्यांनी नेमलेल्या मुकादमांकडून या कामगारांनी आधीच पन्नास-साठ हजार रुपये कर्ज उचललेले असते. त्यापैकी यंदाच्या कामातून किती फिटलेत, हे पाहिले जाते. मुकादमाकडून पुन्हा नवी उचल दिली जाते. ही उचल आणि जुने कर्ज फेडण्यासाठी मजूर पुढच्या वर्षी पुन्हा कामावर हजर होतो. मुळात हे सगळे कामगार निरक्षर असल्याने त्यांना हिशेब समजत नाही. त्यांनी उचललेल्या कर्जावर व्याज लावले जाते. एवढेच नव्हे, त्यांना उसाच्या वाहतुकीसाठी पुरवल्या जाणाऱ्या बैलगाड्यांचे भाडेही (मोसमाला सात हजार) त्यांच्याकडूनच वसूल केले जाते. मूळ कर्ज, त्यात नवी भर, बैलगाडीचे भाडे आणि या सगळ्यांवरचे व्याज अशी रक्कम फुगतच जाते आणि यांचे कर्ज कधीच फिटत नाही. आयुष्य असे कर्जातच अखंड बुडून राहत असताना, दिवाळी कसली साजरी करणार? या मजुरांना ऐन दिवाळीतही सुटी नसते. रोजच्या खाण्याचेच वांधे असल्याने फटाके, नव्या कपड्यांचा प्रश्नच उद्भवत नाही. गोडधोड करण्याची ऐपत नसते. दिवाळीसाठी मुकादम त्यांना खर्चासाठी म्हणून दोनशे रुपये देतो खरे; पण तेही पुन्हा हिशेबातून कापून घेतले जातात. सतत कंबरेत वाकून ऊसतोड केल्याने या कामगारांना पाठीचे, कंबरेचे आजार जडतात. मोसमाच्या सुरुवातीला शरीराला सवय नसल्याने ही माणसे आजारी पडतात. अशा वेळी त्यांना दवाखान्यात नेले जाते; पण त्याचा खर्चही हिशेबातून वजा केला जात असल्याने आजारी पडणेही त्यांना परवडणारे नसते. आई-बाप ऊसतोडीसाठी स्थलांतरित झाल्याने मुलांची शाळा पूर्ण होत नाही. मग दहा-बारा वर्षांची झाल्यावर मुलेही हातात कोयता, नंतर शिरावर बापाच्या कर्जाची जबाबदारी घेतात आणि हळूहळू ऊसतोड कामगारांची नवी पिढी घडत जाते... एवढ्या सगळ्या उपद्व्यापातून दोनच गोष्टी होतात- एक तर त्या कामगाराच्या कुटुंबाचे पोट भरते आणि दुसरे म्हणजे, गेल्या वर्षीचे कर्ज फेडल्याचे समाधान लाभते!- त्वचेला भेगा पाडणाऱ्या थंडीत आणि शरीराला होरपळून काढणाऱ्या उन्हात ही माणसे फक्त जुने कर्ज फेडण्यासाठी पिढ्यान्पिढ्या राबत असतात. त्यांचे हे राबणे समाजाच्या चांगुलपणावरच प्रश्नचिन्ह निर्माण करीत असते...