अडरे : चिपळूण तालुक्यातील अडरे पंचक्रोशीत इतर शहरातून मेंढपाळ दाखल झाले आहेत. आॅक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यात उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले की, फलटण येथून मेंढपाळ मोठ्या प्रमाणात कोकण भागात आपला कळप घेऊन येत असतात. फलटण येथे चाऱ्याची कमतरता असल्याने हे मेंढपाळ कोकणात येतात. येथे पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे सगळीकडे हिरवेगार वातावरण असते आणि चाराही मिळतो. त्यामुळे हे मेंढपाळ या हंगामात कोकणात येतात. चिपळूण तालुक्यात विशेषकरुन सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये असणाऱ्या गावामध्ये हे मेंढपाळ आपल्या कळपासह मेंढ्या रानातून फिरवत असतात. अशा ठिकाणी एखादी झोपडी उभारुन त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करतात. मेंढ्याच्या एका कळपामध्ये १५० याप्रमाणे सुमारे फलटण येथून २० कळप निघाले आहेत. यातील अडरे पंचक्रोशीमध्ये ३ कळप दाखल झाले आहेत. या कळपामध्ये घोडे व कुत्रे यांचाही समावेश असतो.पश्चिम महाराष्ट्रात फलटण, माण, खटाव या भागातून मेंढपाळ कोकणात येतात. त्या भागात दरवर्षी चाऱ्याची कमतरता असते. अनेक ठिकाणी छावण्या काढाव्या लागतात. मात्र, कायमस्वरूपी हा प्रश्न सुटत नाही. गेली कित्येक वर्ष मेंढपाळांचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, कोकणात येणाऱ्या मेंढपाळांची संख्या दरवर्षी वाढत आहे. सावर्डे, कामथे, अडरे, परशुराम, कुटरे या भागाकडे मेंढपाळांनी आपले लक्ष वळविले आहे. (वार्ताहर)घाटावरून येणारे मेंढपाळ या हंगामात कोकणात दाखल होतात. यंदाही हे प्रमाण मोठे आहे.चाऱ्याची कमतरता असल्याने मेंढपाळ फलटणमधून कोकणात दाखल.
अडरे पंचक्रोशीत मेंढपाळ दाखल
By admin | Updated: November 9, 2014 23:33 IST