मंडणगड : मंडणगड शहरातील एस. टी. बसस्थानकापासून २४ मीटर अंतर आणि जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेपासून अवघ्या ७५ मीटर अंतरावर सुरू असणाऱ्या त्या देशी दारू दुकानावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी दिले आहेत.मंडणगड येथील देशी दारू दुकानाचा विषय गेले काही दिवस गाजत आहे. अखेरीस या दुकानाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर भूमिका घेत या दुकानावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.या दुकानाच्या बाबतीत चुकीच्या पध्दतीने एस. टी. स्टॅण्डसमोरून अंतर घेऊ नये व मराठी शाळेपासून सरळ अंतर घेऊ नये, याकरिता जाणूनबुजून गडगा घालून शासनाच्या गोदामातून अंतर दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याबाबत संजय राणे यांचे मोठे बंधू रवींद्र बाबुराव राणे यांनी १९९५पासून तक्रार करून न्याय मागितला होता. मात्र, राज्य उत्पादन शुल्क खात्याने न्याय दिला नाही, असे राणे यांचे म्हणणे होते. मुद्दाम गडगा घालून लांबून अंतर दाखवण्याचा प्रकार आता राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अंगलट आला आहे.जिल्हाधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधीक्षकांनी याबाबत गंभीर भूमिका घेतली असून, याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सध्या ज्या जागेत हे दुकान चालू आहे, ती हद्द ग्रामपंचायत, मंडणगडच्या जागेत येत असल्याचे दिसून आले आहे. या जागेवर बांधकाम करण्याकरिता कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही, असेही पुढे आले आहे.ही जागा बिनशेती नाही. व्यापारी बिनशेती असणे ही देशीदारू दुकान व बिअरबार परमिटरुमसाठी आवश्यक आहे. ज्या व्यक्तीचे हे अनधिकृत देशी दारू दुकान आहे, त्याच व्यक्तींनी मंडणगड शहरामध्ये मुख्य राज्यमार्गाला जोडून आरसीसी बांधकामे केली आहेत. याविरूध्दही राणे यांनी न्याय मागितला आहे. जिल्हाधिकारी व तहसीलदारांनी याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे आश्वासन राणे यांना दिले आहे. दरम्यान, अनधिकृत बांधकामाविरूध्द गेले अनेक दिवस चर्चा झडत होत्या. मात्र, त्याविरूध्द कारवाईचे आदेश देण्यात आल्याने नागरिकांनी जिल्हा आणि तालुका प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत. याप्रकरणी त्वरित कारवाई करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)
कारवाईचे दिले आदेश
By admin | Updated: December 29, 2014 00:01 IST