खेड : राज्यातील प्रदूषणकारी कारखान्यांनी तसेच स्थानिक स्वराज्य सस्थांनी त्यांचे सांडपाणी प्रक्रिया न करताच सोडल्यास त्या उद्योग व संस्थांच्या प्रमुखांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी खेड येथे दिला. राज्यातील पाण्याचे स्रोत आणि प्रवाह तीन महिन्यात प्रदूषणमुक्त करण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.खेड व दापोली तालुक्यातील विकास योजनांची अंमलबजावणी तसेच प्रदूषणांच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी खेड येथील शासकीय विश्रामगृहात विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. सर्व नगरपालिका व महापालिकांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबविलेच पाहिजेत, असे ते म्हणाले. त्यासाठी येणाऱ्या खर्चाचा २५ ते ३० टक्के निधी राखून ठेवण्याची सूचना सर्व संबधित नगरपालिका व महापालिका यांना देण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाचा उर्वरित ७० टक्के निधी केंद्र शासनाकडून मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.जिल्ह्यातील दगड आणि चिरेखाणीमुळे हवा, पाणी आणि शेतीचे नुकसान होत आहे. ज्या ठिकाणी अशा खाणींना शेतकऱ्यांचा विरोध असेल, त्या प्रदूषणकारी दगडखाणी बंद करण्याचे निर्देशही त्यांनी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पर्यावरणाचे मुद्दे व विकास कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसंदर्भात जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्राम समिती स्थापन करण्यात आली आहे. गावांच्या आणि जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने पडलेले हे महत्त्वाकांक्षी पाऊल आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदनअवैधरित्या डोंगर पोखरणाऱ्या जिंंदल उद्योग समुहाला ५६ कोटींचा दंड ठोठावणारे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांचेही पर्यावरण मंत्र्यांनी यावेळी अभिनंदन केले. राज्याचे हित जपणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.
प्रदूषित उद्योगांच्या प्रमुखांवरच कारवाई
By admin | Updated: January 5, 2015 23:24 IST