सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे यावर्षी अद्यापपर्यंत तब्बल २४२ घरांची पडझड झाली असून नैसर्गिक आपत्तीमुळे खासगी, सार्वजनिक मालमत्तेसह जनावरांचे असे मिळून ५५ लाख ५९ हजार रूपयांचे नुकसान झाले असून दोन व्यक्तींनी आपला प्राण गमवावा लागला आहे. लाखोंच्या घरात नुकसानी असताना मदत मात्र ३१ हजार ६०० रूपये प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.सिंधुदुर्गात यावर्षीचा पावसाळी हंगाम जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झाला. मात्र, त्यातही पावसाला सातत्य राखण्यास अपयश आले. पावसाला नुकतीच सुरूवात झाली असताना हवामानात झालेल्या अचानक बदलामुळे त्याचा पावसावर परिणाम झाला व पावसाने दडी मारली. त्यानंतर ९ जुलैला पावसाने सुरूवात केली. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ७०० मि.मी. पाऊस कमी झाला आहे. पावसाची ही आकडेवारी समांतर येण्यास खूप वेळ लागणार आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्गात कमालीचा पाऊस पडतो. त्यापासून होणारी नुकसानीही तितक्याच प्रमाणात असते. पावसाप्रमाणे वादळाचा तडाखाही जिल्ह्याला बसत असून ठिकठिकाणी झाडे रस्त्यावर, घरांवर, गोठ्यावर, वाहनांवर उन्मळून मोडून पडून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. ६५ मि.मी. पाऊस पडणाऱ्या भागातच मिळते नुकसानीया पावसाळी हंगामात तब्बल ५६ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. यापैकी किरकोळ स्वरूपात मदत म्हणून देण्यात आली आहे. यात शासन निकषाप्रमाणे जर एखाद्या ठिकाणी नुकसान झाले असेल व त्याठिकाणी ६५ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडला असेल त्याच भागातील संबंधितांना शासनामार्फत नुकसान भरपाई दिली जाते. जर ६५ मि.मी.पेक्षा कमी पाऊस पडून त्या ठिकाणी नुकसानी झाली तर त्याला नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे या निकषात न बसल्यामुळे नुकसानी होवूनदेखील लोकांना ती मिळत नसल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. या नियमात शिथीलता आणण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)अद्यापपर्यंत जिल्ह्यात पावसाचे दोन बळीयावर्षीच्या पावसाळी हंगामात मालवण तालुक्यातील एकाचा तर सावंतवाडी तालुक्यात एकाचा असे एकूण दोघांचा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाला आहे. यापैकी सावंतवाडी तालुक्यातील मृत्यू झालेल्या व्यक्तीला शासकीय मदत देण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र, मदत देण्याबाबत दिरंगाई होताना दिसत आहे.
दोन महिन्यात ५६ लाखांची हानी
By admin | Updated: August 7, 2014 00:17 IST