वेंगुर्ले : वेंगुर्ले येथील किराणा मालाचे घाऊक व्यापारी अनुजा अशोक तेंडोलकर यांचा तेंडोली चेंदवणवाडी येथील आंबा कलमाच्या बागेस आग लागून सुमारे २५० आंबा कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या घटनेत सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. याबाबतची नोंद निवती पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तेंडोली चेंदवणवाडी येथे अनुजा तेंडोलकर यांच्या २५० आंबा कलमांच्या बागेला अचानक आग लागली. आग लागण्याचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. भोम येथील अनुजा तेंडोलकर यांच्या मालकीच्या जागेत वाडीतील काही लोकांनी पत्र्याची शेड बांधण्यासाठी सामान आणून ठेवले होते. मात्र, तेंडोलकर यांनी विरोध केला. त्याच दिवशी सायंकाळी बागेस आग लागल्याने तेंडोलकर यांनी या आगीविषयी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. अशा घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी पोलिसातही या घटनेची नोंद करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)
बागेस आग लागून ५ लाखांची हानी
By admin | Updated: May 10, 2014 00:03 IST