सिंधुदुर्गनगरी : माळीण गावच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासनाच्यावतीने डोंगरानजीक असणाऱ्या गावांचा सर्व्हे करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील तब्बल ४४ गावे ही दरडप्रवण (दरडीखाली वसलेली) क्षेत्र म्हणून प्रशासनाने निश्चित केली आहेत. ‘त्या’ गावातील २३६६ कुटुंबांतील सुमारे ८९८२ लोकांना भविष्यात दरडीचा धोका संभवण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे.३० जुलै २०१४ रोजी पुणे जिल्ह्यातील आंबेगावमधील माळीण गावावर पहाटे गाढ झोपेत असताना गावावर डोंंगर कोसळून शेकडो जणांचे प्राण गेले होते. संपूर्ण गाव डोंगराखाली गाडला गेला होता. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्याने आपापल्या भागातील गावांचा सर्व्हे करावा व तसा अहवाल शासनास सादर करावा असे आदेश राज्य शासनाच्यावतीने देण्यात आले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने सर्व गावांचा सर्व्हे करून जिल्ह्यात ‘माळीण’सारखी परिस्थिती नसल्याचा अहवाल शासन स्तरावर सादर करण्यात आला होता. मात्र दुसऱ्यांदा करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये जिल्ह्यातील ४४ गावे ही डोंगराच्या पायथ्याशी वसलेली असून भविष्यात ‘त्या’ घरांना धोका संभावण्याची शक्यता असल्याचे समोर आले आहे.माळीणच्या घटनेनंतर सारेच धास्तावले आहेत. कित्येक वर्षांपूर्वी मालवण तालुक्यातील एका गावामध्ये डोंगर खचल्याचा काहीसा प्रकार घडला होता. माळीणच्या भीतीने प्रशासनाने डोंगरकपारीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या वस्तीचे आणि डोंगराच्या पृष्ठभागाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले होते. त्यानुसार तहसीलदारांमार्फत प्रत्येक गावागावाचा सर्व्हे करण्यात आला होता. त्यानुसार तब्बल ४४ गावे ही डोंगरपायथ्याशी वसलेली असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. या जिल्ह्यामधील वैभववाडी, सावंतवाडी व मालवण या तीन तालुक्यातील तब्बल २५४८ कुटुंबातील ८९८२ लोकांना भविष्यात दरडीचा धोका संभवण्याचा अंदाजही प्रशासनाच्यावतीने वर्तविण्यात आला असून त्या दृष्टीने संबंधितांनी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याची माहितीदेखील देण्यात आली आहे. कोकण हा प्रामुख्याने सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील उतारावर वसलेला प्रदेश आहे. येथील मातीही अतिशय कमकुवत, अपरिपक्व, भूगर्भातील कातळाशी एकजीव न झालेली आहे. परिणामी मातीमध्ये मुरणारे पावसाचे पाणी थेट कातळापर्यंत जाऊन पाण्याचा अंतर्गत प्रवाह सुरु होतो आणि मातीचा स्तर ढासळू लागतो. काही अवधीनंतर ही माती पाण्याच्या दाबाने खाली घसरून पडते असे भूवैज्ञानिकांचे म्हणणे आहे. तसेच जंगल संपत्तीवर घाला घालण्याचे प्रयत्न सुरु असल्याने पावसाच्या प्रचंड पाण्याला डोंगराच्या भूपृष्ठावर अडविण्याचा आधारच शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे या मातीला घट्ट धरून ठेवणारे वृक्ष आणि वनस्पती आवश्यक त्या प्रमाणात भूपृष्ठावर शिल्लकच राहिलेल्या नाहीत. मालवण तालुक्यातील तीन गावे, वैभववाडीतील २५ गावे, सावंतवाडी तालुक्यातील १६ गावे अशी एकूण ४४ गावे ही दरड प्रवण गाव म्हणून प्रशासनाच्यावतीने निश्चित करण्यात आली आहेत.सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शासनाच्या सूचनादरम्यान, संबंधित गावांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाच्यावतीने काही सूचना केल्या आहेत. यामध्ये संबंधित दरडप्रवण गावांनी डोंगर स्तरावर वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. पाण्याचा निपटारा होण्यासाठी चर खणणे, वृक्षांची लागवड करणे, गवताची लागवड करणे, संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे अशा उपायांनी दरड कोसळण्याच्या समस्येवर बऱ्याच प्रमाणात मात करता येईल.गिरीष परब
सिंधुदुर्गातील ४४ गावे माळीणसारखी!
By admin | Updated: June 1, 2015 00:16 IST