कणकवली : आंबा तसेच काजू नुकसानभरपाईपोटी शासनाकडून कणकवली तालुक्याला ६ कोटी २ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी ४३ लाख ९३ हजार ५३८ रुपयांची नुकसानभरपाई गुरुवारपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे, तर ६ लाख २१ हजार रुपयांची देयके ट्रेझरीकडे जमा करण्यात आली आहेतनैसर्गिक आपत्तीमुळे कणकवली तालुक्याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले होते. आंबा तसेच काजू बागयतदारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक हानीला सामोरे जावे लागले होते. तर अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे बगायतदारांना तसेच शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सर्व स्तरातून होत होती. या पार्श्वभूमिवर शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. ही नुकसान भरपाईची रक्कम आता प्राप्त झाली आहे. महत्प्रयासाने नुकसानभरपाई मिळाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली आंबा तसेच काजू नुकसान भरपाई शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी महसूल तसेच कृषि विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. कणकवली तहसील कार्यालयाकडून गुरुवारपर्यंत सुमारे ४४ लाख रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात या कामाला आणखीन वेग येणार आहे. शेतकऱ्यांपर्यंत नुकसान भरपाईची रक्कम लवकरात लवकर वितरीत करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे तहसीलदार समीर घारे यांनी सांगितले. (वार्ताहर)बागायतदारांना दिलासासिंधुदुर्ग जिल्ह्याचे अर्थकारण बहुतांश आंबा तसेच काजू उत्पादनावर अवलंबून आहे. मात्र, अलीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे बागायतदारांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अवकाळी पाऊस तसेच हवामानातील वरचेवर होणारे बदल याचा फटका शेतकरी तसेच बागायतदारांना बसत आहे. पर्यायाने बगायतदारांबरोबरच जिल्ह्याच्या अर्थकारणावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे बागायतदारांना नुकसानभरपाई देण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे काहीसा दिलासा बागायतदारांना मिळाला आहे.
नुकसानभरपाईच्या ४४ लाखांचे वितरण
By admin | Updated: September 26, 2015 00:22 IST