सातारा : केंद्र आणि राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जिल्हा परिषदेतील अधिकारी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नाही, काही सांगितल्यास ऐकत नाही, असा आरोप करत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी विषयपत्रिकेसह ४२ विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी सभागृहात सर्वसाधारण सभा झाली. यावेळी विषय पत्रिकेवरील कातरखटाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत वडूज उपकेंद्राची इमारत पाडून नवीन बांधकाम करणे या विषयावरून सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले. सभागृहात नुकतेच इमारत पाडण्याचे ठराव घेतले जातात अधिकारी त्याचा पाठपुरावा करताना दिसत नाहीत. इमारतीला निधीच मिळत नसेल, तर पाडण्याचा कारण काय? याचा खुलासा झाल्याशिवाय पुढील विषय घेऊ नयेत, वडगाव हवेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत सभागृहात वेळोवेळी आवाज उठविला. याबाबत काहीही कार्यवाही केली जात नाही. ज्या गावात जागा उपलब्ध नाही, तेथे प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी दिली आहे. जागा उपलब्ध आहे, तेथे आरोग्य केंद्रास मंजुरी आहे, असा सावळा गोंधळ सुरू असल्याचे जयवंत जगताप यांनी सांगितले. आरोग्य उपकेंद्राबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवावेत, निधीसाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी जालिंदर पाटील यांनी केली. या चर्चेत सतीश चव्हाण, राजू बोसले यांनी सहभाग घेतला.पळशी आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला टायर नाही. त्यामुळे रुग्णांचे हाल होतात. बहुतांश आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची वीज बिले न भरल्यामुळे वीज तोडली आहे. वीजबिल भरण्यासाठी जिल्हा परिषदेने निधीची तरतूद करावी, अशी मागणी अनिल देसाई यांनी केली. यावेळी डॉ. दिलीप माने यांनी वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर अध्यक्ष सोनवलकर यांनी तांत्रिक अडचणी असल्यास संबंधितांशी चर्चा करून सोडविणार असल्याचे सांगितले. अधिकारी ऐकत नसल्याचे सांगत सत्ताधारीच सभेत सांगत होते. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला.यावेळी जलयुक्त शिवार, कृषी विभागांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. शशिकांत पवार, सदाशिव जाधव, राहुल कदम, देवराज पाटील, स्वाती बरदाडे यांनी विविध विषयांवर सूचना केल्या. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेत सत्ताधारीच आक्रमक!
By admin | Updated: February 5, 2015 20:19 IST