सातारा : जिल्हा परिषद शाळेतून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. ज्ञानदानात या शाळांचे शिक्षक कुठेही कमी नाहीत. सामाजिक क्षेत्रांमध्ये तसेच देशाच्या व राज्याच्या प्रशासनात उच्चपदावर काम करणारे अधिकारी हे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आहेत. शिक्षकांनी पुढील काळातही अशाच पद्धतीने विद्यार्थी घडावावेत, अशा भावना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केल्या.
जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात सन २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षांतील ‘आदर्श प्राथमिक शिक्षक’ पुरस्काराचे वितरण पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, महिला व बाल विकास सभापती सोनाली पोळ, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, अरुण गोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, मुख्य लेखाधिकारी विकास सावंत, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रभावती कोळेकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘कोरोना संसर्गामुळे अनेक निर्बंध घालण्यात आले. अशा काळातही विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे चांगले काम शिक्षक करीत आहेत. जिल्हा परिषदेचा शिक्षणाचा दर्जा चांगला आहे. हा दर्जा वाढविण्यासाठी स्मार्ट टीव्ही, संगणक देण्यात आले आहेत. त्याचबरोबर स्मार्ट बोर्डसाठी चार कोटींची तरतूदही केली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत शिक्षकांनी चांगल्या पद्धतीने काम केले. ज्या शिक्षकांना पुरस्कार मिळाला आहे त्यांची जबाबदारी आता वाढली आहे. लवकर कोरोनाचे संकट दूर होईल आणि पुन्हा शाळा गजबजून जातील.
यावेळी जिल्हा परिषदेच्या ४५ शिक्षकांना शाल, प्रमाणपत्र व पुस्तक भेट देऊन गौरव करण्यात आला. प्रास्ताविकात शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी शैक्षणिक आढावा घेतला. या कार्यक्रमास पुरस्कार प्राप्त शिक्षक, शिक्षिका व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
(चौकट)
जिल्ह्यातील ९५ टक्के
शाळा डिजिटल : कबुले
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले म्हणाले, सातारा जिल्ह्यातील ९५ टक्के शाळा डिजिटल झाल्या आहेत. ज्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा नाही अशा ठिकाणी भेट देऊन मुलांना शिक्षण दिले जात आहे. खासगी शाळांमुळे स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी झोकून देऊन काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी केले. तर जिल्हा परिषदेच्या शाळांना नवलौकिक मिळावा यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले.
फोटो : ०६ पुरस्कार सोहळा
जिल्हा परिषदेच्या सभागृहात सोमवारी दुपारी झालेल्या कार्यक्रमात आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, उदय कबुले, प्रदीप विधाते, विनय गौडा आदी उपस्थित होते.