सातारा : कण्हेर धरणाजवळ सापडलेल्या मगरीसोबत सेल्फी काढण्याचा सुनील कडव (रा. साबळेवाडी, कण्हेर परिसर) या युवकाने प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्या डाव्या हाताचा मगरीने चावा घेतला, अशी माहिती वनअधिकारी गजानन भोसले यांनी दिली. रविवारी सकाळी कण्हेर धरणाच्या खालील बाजूस एक मगर नदीतून वर आल्याची माहिती आजूबाजूच्या परिसरात समजली. त्यानंतर काही युवक मगर पाहण्यासाठी तेथे गेले. त्यातील सुनील कडव या युवकाने मगरीसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मगरीने त्याच्या हाताचा चावा घेतला, असे वनअधिकारी भोसले यांनी सांगितले, तर सुनील कडव याने ‘आपण गुरे चारायला गेलो होतो. त्यावेळी मगरीने माझ्यावर हल्ला केला,’ अशी माहिती मेढा पोलिसांना दिली आहे. मात्र, तो सेल्फी काढण्यासाठीच मगरीजवळ गेला होता, आमच्याजवळ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचेही वनविभागाचे अधिकारी भोसले यांनी सांगितले. जखमी सुनील कडववर साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)
मगरीसोबत सेल्फी काढताना युवक जखमी
By admin | Updated: July 18, 2016 00:31 IST