शिरवळ : खंडाळा तालुक्यातील कापूरहोळ व भोर रस्त्यावरील हरतळी फाटा याठिकाणी एका हाॅटेलसमोर रस्ता ओलांडणाऱ्या युवकाचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमध्ये जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये शंकर मधुकर महाले (वय २९, रा. वडवाडी ता. खंडाळा) असे जागीच ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वडवाडी याठिकाणी शंकर महाले हा कुटुंबीयांसमवेत राहण्याकरिता आहे. दरम्यान, शंकर महाले हा नेहमीप्रमाणे काही कामानिमित्त हरतळी फाटा याठिकाणी गेला होता. यावेळी एका हाॅटेलसमोर कापूरहोळ-भोर जाणारा रस्ता ओलांडत असताना अचानकपणे भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने शंकर महाले याला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, धडकेमध्ये शंकर महाले हा गंभीर जखमी झाला. यावेळी गंभीर जखमी झालेल्या शंकर महाले याला शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी दाखल केले असता डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
दरम्यान, शंकर महाले याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी करण्यात येऊन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
या घटनेची फिर्याद विठ्ठल महाले यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे हे करीत आहेत.