मंगेश बंडू कडव (वय ३४, रा. आगाशिवनगर-मलकापूर) असे वारणा नदीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तर याप्रकरणी विंग (ता. कऱ्हाड) येथील ओंकार खबाले-पाटील, स्वाती राजेंद्र बोराटे यांच्यासह अन्य चौघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मृत मंगेशचा भाऊ गणेश कडव याने याबाबतची फिर्याद पोलिसात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबर रोजी मंगेशला विंग येथील ओंकार खबाले-पाटील याने फोन करून बोलाऊन घेतले होते. दुपारी ३ वाजण्याच्यासुमारास मंगेश विंगला गेला होता. त्यानंतर दुपारी ४ वाजण्याच्यासुमारास मंगेशच्या वडिलांना ओंकारने फोन करून मंगेशला येथून घेऊन जावा, नाही तर त्याला जिवंत ठेवणार नाही, असे सांगितले. त्यामुळे मंगेशचे वडील तातडीने त्याठिकाणी गेले. त्यावेळी ओंकार खबाले-पाटील याच्यासह त्याची बहीण स्वाती बाराटे व अन्य चौघांनी मंगेशला मारहाण केल्याचे त्यांना दिसून आले. वडिलांनी ओंकारकडे विनंती करून मंगेशला सोडविले. त्यानंतर मंगेश त्याच्या दुचाकीवरून तेथून निघून गेला. मात्र, तो घरी परतला नाही. कुटुंबियांनी रात्री उशिरापर्यंत त्याची वाट पाहिली. तसेच त्याचा शोधही घेतला; मात्र, तो आढळून आला नाही. त्यानंतर दुसऱ्यादिवशी ओंकारने मंगेशच्या वडिलांना फोन करून मंगेशचा मोबाईल त्याच्याकडे असल्याचे सांगितले. तसेच तो मोबाईल देताना मंगेशला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकीही त्याने दिली.
दरम्यान, मंगेशचा शोध सुरू असताना, पेठ वडगावच्या हद्दीत वारणा नदीच्या पुलावर त्याची दुचाकी बेवारस स्थितीत आढळून आली. पोलिसांनी ती दुचाकी ताब्यात घेऊन मंगेशचा शोध सुरू केला. याचदरम्यान शनिवारी मंगेशच्या कुटुंबियांनी तो बेपत्ता असल्याबाबतची तक्रार कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांसह नातेवाईक त्याचा शोध घेत असताना रविवारी मंगेशचा मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यातील कणेगावच्या हद्दीत वारणा नदीपात्रामध्ये आढळून आला.
याबाबत गणेश कडव याने दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगेशला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहाजणांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून, कुरळप पोलीस ठाण्यातून हा गुन्हा कऱ्हाड ग्रामीण पोलिसांकडे सोमवारी वर्ग करण्यात आला आहे.
- चौकट
पैशांसह दागिन्यांची मागणी!
मंगेशला आरोपींनी पैशांसह दागिन्यांची मागणी केली होती. मंगेशने वेळोवेळी ती मागणी पूर्णही केली होती. त्यातच ओंकार मोबाईल शॉपीसाठी दोन लाख रुपये मंगेशकडे मागत होता, असेही गणेश कडव याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
फोटो : ०६मंगेश कडव