तांबवे : वसंतगड, ता. कऱ्हाड येथे छत्रपती संभाजीराजे गड किल्ले संवर्धन संघ व बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा दलाच्या वतीने गडावर दोन दिवस संवर्धन कॅम्प आयोजित करण्यात आला होता. विद्यालयाचे ९० विद्यार्थी व संघाचे ४० कार्यकर्त्यांनी अंदाजे दोन दिवसांत गडावर चार लाखांचे काम पूर्ण केले. कॅम्पसाठी कऱ्हाडचे रणजित जाधव व विट्याचे अॅड. विजय जाधव यांनी अर्थसहाय्य केले. या कॅम्पमध्ये गडावरील कोयना तळ्यातील काटेरी वनस्पती नष्ट करून तळ्याच्या एका बाजूस तट बांधण्यात आला. कृष्णा तळ्यावर तब्बल ३६ फूट लांब, तर बारा फूट रुंद व १८ फूट खोल बंधारा बांधण्यात आला. पुरातन काळातील सतीशिळा झाडाझुडपांनी झाकून गेल्या होत्या. त्यावरील घाणीचे साम्राज्य नष्ट करण्यात आले. गडावरील चुना घाण्याची डागडुजी करण्यात आली. तीन महिन्यांपूर्वी गडावर सहाशे डाळिंब व आंब्याची झाडे लावली आहेत. त्यास मातीची भर घालण्यात आली. यावेळी विद्यालयाचे एन. व्ही. शिंदे, पी. डी. पाटील, डॉ. जे. ए. म्हेत्रे, एम. व्ही. पाटील, प्रा. बोलाईकर, प्रा. चौगुले, प्रा. चौबे, प्रा. रजपूत, प्रा. कांबळे, प्रा. काकडे, प्रा. मसराम, यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पचे आयोजन करण्यात आले. वसंतगड व तळबीडच्या ग्रामस्थांनी कॅम्पसला मोलाचे सहकार्य कले. यावेळी संघाचे अॅड. अमित नलवडे, नीलेश यादव, संतोष साळुंखे, विराज पाटील, वैभव पाटील, रामचंद्र माळी, नीलेश पाटील, अजित करंदीकर आदींनी सहकार्य केले. (वार्ताहर)
गड संवर्धनासाठी युवकांचा जागर
By admin | Updated: February 9, 2015 00:47 IST