दरम्यान, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घातलेल्या कडक निर्बंधामुळे पारंपरिक व साध्या पद्धतीने एकाच मानाच्या गाड्यासह जीपमधून ही मिरवणूक काढण्यात आली. सोमवारी विवाह सोहळ्याचा मुख्य दिवस असल्याने पाल व परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. पालमध्ये येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. संचारबंदी असल्याने कोणालाही मंदिराचा परिसर व आजूबाजूच्या १० किलोमीटर अंतरापर्यंत प्रवेश देण्यात आला नाही.
दुपारी देवाचे मुख्य मानकरी देवराज पाटील यांच्या घराजवळ गावातील मोजकेच मानकरी उपस्थित होते. त्यानंतर मानकरी देवराज पाटील यांचा मुलगा तेजराज पाटील यांनी ग्रामप्रदक्षिणा घातली. त्यानंतर ही मिरवणूक दुपारी खंडोबा मंदिरात पोहोचली. तेजराज पाटील यांच्या हस्ते देवाच्या मूर्तीची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर खंडोबा व म्हाळसा यांचे मुखवटे तेजराज पाटील यांनी पोटास बांधले. खंडोबा व म्हाळसा या देवतांच्या मुखवट्यासह फुलांनी सजवलेल्या जीपमध्ये ते विराजमान झाले. त्यानंतर मुख्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी 'येळकोट येळकोट... जय मल्हार, सदानंदाचा येळकोट..'चा गजर करण्यात आला. या मिरवणुकीत गावातील सासनकाठ्या, मानाचा गाडा, फुलांनी सजवलेल्या छत्र्या सहभागी झाल्या होत्या. देवालयातून निघालेली मिरवणूक तारळी नदीतीरावर पोहोचली. यावेळी मोजक्याच भाविकांनी भंडारा, खोबऱ्याची उधळण करण्यास सुरुवात केली. मानकरी देवाचे मुखवटे बरोबर घेऊन जीपमधून विवाह समारंभासाठी ठरावीक वऱ्हाडी मंडळीसमवेत विवाह मंडपाकडे निघाले होते. सायंकाळच्या सुमारास मिरवणूक विवाह मंडपात पोहोचली. मानकऱ्यांनी देवास बोहल्यावर चढविल्यानंतर पारंपरिक पद्धतीने गोरज मुहूर्तावर श्री खंडोबा व म्हाळसाचा विवाह सोहळा विधीवत पार पडला.
कोरोना महामारीच्या अनुषंगाने प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांमुळे वाळवंट रिकामे दिसून येत होते. यात्राकाळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
फोटो : २५केआरडी०७
कॅप्शन : पाल (ता. कऱ्हाड) येथे सोमवारी मानकरी व मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळा पार पडला. यावेळी भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. (छाया : अजय जाधव)