सातारा : गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात ‘लोकमत’ने राबविलेल्या ‘डॉल्बी बंदी’ चळवळीला सातारा जिल्ह्यात भरभरून यश मिळाले होते. सातारकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या भावनेचा आदर करत यंदाही ‘आवाज गावाचा... नाय डॉल्बीचा’ ही मोहीम मोठ्या ताकदीने राबविली जाणार आहे. गणेशोत्सव, दुर्गोत्सवात तऱ्हाट होऊन नाचण्यासाठी ट्रॅक्टरवर दहा ते बारा फुटांच्या ध्वनिक्षेपकांच्या भिंती उभारण्याचे फॅडच आले होते. कानांचे पडदे फाडेल एवढा आवाज करून झिंगाट होऊन नाचण्याचा तरुणाई आनंद घेत होते. मात्र, त्यांचा रुग्ण व लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. दोन वर्षांपूर्वी गणेश विसर्जन मिरवणुकीत खिडक्यांच्या काचा, इमारत हादरवेल एवढा मोठा आवाज येत असल्याने राजपथावर वडापाव विकत असलेले बाळू मामा यांच्या वडापाव गाडीवर जुनी इमारत पडली होती. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर ‘लोकमत’ने ‘आवाज गावाचा... नाय डॉल्बीचा’ ही लोकचळवळ उभारली. एक-एक करत गावच्या गावे सामील होत होती. गावातून डॉल्बी बंदीचा ठराव केला जात होता. सुरुवातीस तरुणांमधून नाराजी पसरली असली तरी गावच्या निर्णयापुढे हळूहळू त्यांचा आवाज कमी झाला. यंदाही ही मोहीम पुन्हा एकदा मोठ्या ताकदीने राबविली जाणार आहे. विशेष म्हणजे, सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमधून नागरिकांनी स्वत:हून दूरध्वनी आणि मेसेजद्वारे ही मोहीम कायमस्वरूपी चालविण्याची सूचना ‘लोकमत’ला केली आहे. (प्रतिनिधी) नूतन अधीक्षकांकडून अधिक अपेक्षा सातारा जिल्ह्याचे नूतन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या सामाजिक जाणिवेविषयी सातारकरांना कौतुक आहे. त्यामुळे यंदा त्यांच्या मार्गदर्शनाखाली होणारा जिल्ह्यातील पहिला गणेशोत्सव खऱ्या अर्थाने ‘शांततेत’ पार पडेल, अशीही खात्री सातारकरांना वाटत आहे. यंदा डॉल्बीवाल्यांना एक स्पीकर अन् दोन बासला परवानगी दिल्याचे प्रसारमाध्यमांमधून समजले. खरंतर आजपर्यंत परवानगी ऐवढीच असायची. तरीही वर्षानुवर्षे डॉल्बीचा दणदणाट तमाम सातारकर सहन करत आले होते. आता मात्र सहनशीलता संपली आहे. डॉल्बीला परवानगीच देऊ नये, अशी सर्वसामान्य जनतेची प्रामाणिक इच्छा आहे. - शीतल पाटील, सातारा
यंदाच्या गणेशोत्सवातही डॉल्बीचा आवाज दबणार !
By admin | Updated: August 5, 2016 02:06 IST