कऱ्हाड : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा २६ मार्चला ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी सत्ताधार्यांना थेट लेखी प्रश्नावली सादर केली आहे. या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
खरं तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन होताना दिसत आहेत. त्याप्रमाणे कृष्णा कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा ही ऑनलाईन होणार आहे. पण या सभेचा विषय जरा वेगळाच आहे. कारण मेमध्ये कारखान्याची निवडणूक होण्याची शक्यता आहे. कारखान्याच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत विरोधक सत्ताधाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करून त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात, हा इतिहास आहे. यंदा मात्र विरोधकांना ही संधी गमवावी लागली आहे. तरीदेखील डॉ. मोहिते यांनी लेखी प्रश्नावली देऊन सत्ताधाऱ्यांना अडचणीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
मोहिते यांनी कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना २२ मार्चरोजी लेखी पत्र दिले आहे. त्यामध्ये सभेच्या अनुषंगाने ४४ प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या सगळ्यांची समाधानकारक उत्तरे मिळावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. आता हे सगळे प्रश्न नक्की काय आहेत, याची सभासदांना उत्सुकता लागलेली आहे.
इंद्रजित मोहिते यांनी विचारलेल्या प्रश्नांपैकी काही प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत- आपण सभासदांचे सक्तीने राजीनामे घेतले आहेत का? मृत सभासद वारसांना वेळेवर सभासद न केल्याने त्यांना मतदानापासून वंचित का ठेवले? अपात्र लोकांना सभासद केले आहे, ते खरे आहे का? अक्रियाशील सभासद ही प्रक्रिया फक्त आपल्याच कारखान्यात का राबवली? ऊस तोडणीस विलंब का? ऊस तोडणी प्रक्रियेत दोष आहेत, आपण त्यात दुरुस्ती केली का? तोडणी वाहतूक खर्चाव्यतिरिक्त अधिकचे पैसे घेतले जातात, त्याबाबत आपण काय कार्यवाही केली? सभासदांचा ऊस बाहेर का जातो? तो रोखण्यासाठी आपण काय केले? आपल्या क्षेत्रात नोंदवलेला किती ऊस इतर कारखान्यांना गेला, हे सांगता येईल का? उपसा जलसिंचन क्षेत्रातील ऊस उशिरा का जातो? तोडणी प्रक्रियेमध्ये संचालकांचा हस्तक्षेप का? उपसा जलसिंचन योजनेचे तोटे का वाढू लागलेत? कारखान्यावर कर्ज का वाढत आहे? एफआरपी आपण कायद्याप्रमाणे का देत नाही? इतर कारखान्यांपेक्षा आपला दर कमी का? असे बरेच प्रश्न त्यांनी या लेखी पत्राद्वारे उपस्थित केले आहेत.
आता इंद्रजित मोहिते यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांना ऑनलाईन सभेमध्ये विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले नेमकी काय उत्तरे देतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.