सातारा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणार्या श्री विठ्ठलाची नित्यपूजा वारकरी प्रथा-परंपरेनुसार होण्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये देवस्थान समितीची मनमानी नको, असा इशारा महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत महामंडळाचे उपाध्यक्ष रामेश्वर शास्त्री महाराज यांनी प्रसिध्दीस पत्रक दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाची पूजा कोणी करावी, कशी करावी आणि कोणी करू नये यावरून जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जात आहे. तो निषेधार्ह आहे. विठ्ठल हा सर्वांचा आहे. विठ्ठलाची पूजा करण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र, कोणीही विठ्ठलाच्या नित्यपुजेचे राजकारण करू नये. देवस्थान समितीचे काम व्यवस्थापन पाहण्याचे आहे. मनमानी करुन तेथील वारकरी संप्रदायाची प्रथा, परंपरा, धार्मिकता मोडण्याचा अधिकार समितीला नाही. त्यामुळे श्री विठ्ठलाची नित्यपूजा ही वारकरी सांप्रदायाच्या प्रथा-परंपरेनुसार आणि आचारसंहितेनुसारच झाली पाहिजे. वारकरी महामंडळाने श्री विठ्ठल मंदिर बडवे यांच्या ताब्यातून सोडविण्यासाठी राज्यभर अभूतपूर्व आंदोलन केले होते. वारकरी महामंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय देवस्थान समितीने कोणताही निर्णय घेऊ नये, असेही पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
विठ्ठलाची पूजा वारकरी परंपरेनुसार व्हावी
By admin | Updated: May 13, 2014 00:33 IST