पेट्री : जागतिक वारसा हक्काच्या यादीत समावेश असलेल्या कासच्या शिरपेचात ‘सातारीतुरा’ उमलला आहे. ‘सातारान्सिस’ हे फूल पहिल्या पावसात दर्शन देऊ लागले आहे. तसेच या हंगामात पाचगणी आमरी, पांढरा सापकांदा, छोटा नागरमोथा ही फुलेही उमलली आहेत. उन्हाळ्याची सुटी काही दिवसच बाकी असल्याने राज्याच्या विविध भागांतून पर्यटक महाबळेश्वर, पाचगणीत दाखल होऊ लागले आहेत. त्यातच दुर्मीळ फुले फुलल्याचे समजल्यावर त्यांची पावले कासच्या दिशेने वळायला लागली आहेत. पांढरा सापकांदा, छोटा नागरमोथा, पाचगणी आमरी सध्या काही ठिकाणी ही फुले फुलली आहेत. तसेच या फुलांचा साधारण पंधरा दिवसांचा हंगाम राहतो. मे महिन्यात गेळा, तोरण, करवंद, भोमा, आसाना, आंबा, फणस झाडावर येणारी पांढरी आमरी हे आर्कीड येऊन गेले. हे आर्कीड ज्या भागात येते तो परिसर निसर्ग समृद्ध मानला जातो. तसेच पांढऱ्या मानेचा काळा करकोचा पक्षी साधारण सव्वा फूट उंच पाय असणारा या दिवसात तलावाच्या परिसरात बेडूक, भुई किडे खाण्यास येतो. त्याचे दर्शन होताना दिसत आहे, अशी माहिती बामणोलीचे वनपाल श्रीरंग शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पाचगणी आमरी या फुलाला ‘अबनारिया पाचगणीसीस’ या नावानेही ओळखले जाते. जमिनीत येणारे हे फूल असून, त्याचा हंगाम पंधरा दिवसांचा असतो. फुले पाहण्यासाठी गर्दी होत आहे. (वार्ताहर)पांढरा सापकांदा हे फूल पर्यटकांना भुरळ घालत असून, त्याचे शास्त्रीय नाव ‘आरोशिमा मुदाई’ आहे. हिरवी दांडी, तोंड पांढरे, सापासारखे वाकलेले असते. त्यामुळे त्याला ‘पांढरा सापकांदा’ असे म्हटले जाते.सातारीतुरा या फुलांना शास्त्रीय भाषेत ‘अपोनोजेटॉन सातारान्सिस’ म्हणूनही ओळखले जाते. दुर्मीळ वनस्पतीपैकी मुळाशी कंद असणारे हे भुई आॅर्कीड आहे. पहिला पाऊस झाल्यानंतर सह्याद्रीच्या काही भागात खडकात, मातीचा भाग व त्यामध्ये पाणी साचते अशा ठिकाणी ही वनस्पती आढळते. पानांच्या बेचक्यातून लांब व जाडसर अशा दांड्यात इंग्रजी वाय आकाराचा तुरा येतो. हे फूल केवळ साताऱ्याच्या पश्चिम भागात चार ते पाच ठिकाणीच सड्यावर आढळते. गवताच्या जातीतील छोटा नागरमोथा (लव्ही) पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. कानातल्या फुलाप्रमाणे पाच पाकळ्यांचे फूल असते.
जागतिक वारसास्थळावर फुलला ‘सातारीतुरा’!
By admin | Updated: June 11, 2016 00:56 IST