लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा परिषद शिक्षकांवर शिकविण्यापेक्षा इतर कामांचेच ओझे जास्त पडू लागले आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत असून इंग्रजी शाळांकडे पालकांचा ओढा वाढला आहे. केवळ शिक्षण आणि अध्यापनावर शिक्षण विभागाने लक्ष केंद्रित केले, तर इतर कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारल्यास शिक्षणाची गुणवत्ता सुधारेल, असा शिक्षकांचा सूर आहे.
जनगणना आणि निवडणुकीची कामे शिक्षकांनी स्वीकारली आहेत. मात्र, त्याशिवाय मतदार पुनर्निरीक्षण, बीएलओ या कामांचाही ताण शिक्षकांवर दिला जात आहे. परिणामी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्या कामांसाठी शिक्षकांना वेतन दिले जाते, त्याचे काम न करता अन्य कामांचेच ओझे त्यांच्यावर लादले जाते. असं करण्यापेक्षा शिक्षकांना ज्या कामांसाठी मानधन दिले जाते, ते मानधन बेरोजगारांना देऊन त्यांच्याकडून ही कामे करून घेतली, तर बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल. यापेक्षाही अन्य काही पर्यायी व्यवस्था शासनाला करणं शक्य असेल, तर त्यांनी ती करून शिक्षकांची या अतिरिक्त ताणातून मुक्तता द्यावी, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.
एक शिक्षकी शाळांचे हाल
जिल्ह्यात एक शिक्षकी शाळांचा आकडाही मोठा आहे. त्यात शिक्षकेतर पदे भरण्यावरील बंदी आणि रिक्त पदांमुळे शिक्षकांवर सर्वच वर्गांची जबाबदारी असते. एक शिक्षक शिक्षकेतर कामात अडकून पडला, तर त्याचा विद्यार्थी शिक्षणावर परिणाम होतो.
पॉइंटर
१२४७
जिल्हा परिषदेच्या शाळा
११३९८
जिल्हा परिषद शिक्षकांची संख्या
४,११,१०७
जिल्हा परिषद शाळा विद्यार्थीसंख्या
कोट :
शिक्षकांना अध्यापनाशिवाय ३६ प्रकारची कामे करावी लागतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणावर त्याचा परिणाम होतो. गुणवत्तेचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी शिक्षकांवर अतिरिक्त कामांचे ओझे नको, असं वाटते.
- राजेंद्र बोराटे, शिक्षक
शिक्षक शासकीय कर्मचारी आहे. त्यांना शिक्षणाशिवाय काही कामं दिली तर ते करतात. मूळ ज्या कामासाठी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे, त्या अध्यापनावर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.
- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी
चौकट
शासकीय योजनांचा भार
शिक्षकांना मतदारयादी, पशू, गाव, आरोग्य असे अनेक प्रकारचे सर्वेक्षण, जनजागृती मोहिमा, जनगणना अशी अनेक कामे करावी लागतात. या कामांसाठीच शाळेला एक शिक्षक पूर्णवेळ लागतो.
पोषण आहार, धान्यवाटप आणि त्यासोबत त्याचे १२ प्रकारचे रेकॉर्ड ठेवणे, निवडणुकीची कामे, आरोग्य विभागाचे लसीकरण, गावातील आजारी, वृद्ध, बालकांचे सर्वेक्षण, गोळ्या-औषधांचे वाटप, कृषी विभागाची कामे, प्रत्येक नव्या उपक्रमात शिक्षक केंद्रस्थानी असतो.
कोरोनाकाळातही शिक्षकांना कामे होतीच. शाळेच्या काळात अशी कामे लावल्यावर त्या शिक्षकाने अध्यापन कधी करावे, असा सवालही शिक्षकांनी उपस्थित केला आहे.