सातारा : मांढरदेव यात्रेदरम्यान जिल्हयातील सर्व यंत्रणानी सतर्क राहून स्वयंप्रेरणेने आपापली जबाबदारी पार पाडून यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सज्ज व्हावे, अशा सूचना प्रांताधिकारी रवींद्र खेबूडकर यांनी केल्या.मांढरदेव येथील श्री काळेश्वरी देवीची यात्रा ४, ५ व ६ जानेवारी २०१५ रोजी होणार आहे. त्या यात्रेच्या नियोजनाबाबत आज वाई येथील पंचायत समितीमधील देशभक्त किसनवीर सभागृहात सर्व यंत्रणांची आढावा बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस उपअधीक्षक डॉ. संदीप पखाले, तहसिलदार सदाशिव पडदुने, गटविकास अधिकारी दीपा बापट, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी रवींद्र सांगळे, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रकल्प अधिकारी देविदास ताम्हाणे आदींची उपस्थिती होती.बैठकीत विविध विभागांनी केलेल्या सुविधांविषयी आढावा घेण्यात आला. आरोग्यविभागातर्फे दोन सत्रात चार पथके, जिल्हा रुग्णालयामार्फत १ अशा पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. यात्रेसाठी १४ रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालयामार्फत औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करावा, रक्तपुरवठा तत्काळ उपलब्ध होईल तसेच खासगी हॉस्पीटलमध्ये किमान ५ खाटा राखीव ठेवाव्यात, सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात याव्यात. दर्शन मार्गावरही सीसी टी. व्ही यंत्रणा उभी करुन पोलिस विभागाला त्याचे नियमन करण्यासाठी स्वतंत्र कक्ष देण्यात यावा, भावीकांच्या सोयीसाठी दर्शन रांगेची माहिती देणारे फ्लेक्स फलक लावावेत, स्वयंसेवकांच्या संख्येत वाढ करावी, अवैध प्रवासी वाहतूक होणार नाही करवाई करण्यात यावी अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. (प्रतिनिधी)
मांढरदेव यात्रेसाठी जबाबदारीने काम करा
By admin | Updated: December 5, 2014 23:18 IST