कोरेगाव : कोरेगाव-सातारा रस्त्यावर शिरढोण फाट्यानजीक बुधवारी रात्री अकराच्या सुमारास एसटी बसने समोरून येणार्या रिक्षाला जोरदार धडक दिली. यामध्ये रिक्षातील सुजाता संभाजी पवार (वय २५, रा. अजिंक्यनगर, कोरेगाव) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर पती संभाजी पवार यांच्यासह अन्य एकजण गंभीर जखमी झाले. कुर्डुवाडी आगाराची बस सातार्याकडे येत होती. याचवेळी शिरढोण फाट्यानजीक बसने रिक्षाला समोरासमोर जोरदार धडक दिली. सुजाता यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. जखमी संभाजी पवार आणि त्यांचा मित्र जावेद मणेर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एसटी चालक जालिंदर गिरीगोसावी यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस नाईक आनंद गोसावी अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
शिरढोणजवळ अपघातात महिला ठार
By admin | Updated: May 8, 2014 23:55 IST