कोरेगाव : स्वातंत्र्यसैनिकाच्या वारसाची नोंद करून फेरफार उतारा देण्यासाठी आठशे रुपयांची लाच स्वीकारताना अपशिंगे (ता. कोरेगाव) येथील तलाठी दिलशाद इकबाल मुल्ला हिला सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रंगेहात पकडले. तिला अटक करण्यात आली असून कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. अपशिंंगे येथील स्वातंत्र्य सैनिक असलेल्या व्यक्तीचे दि. २ आॅगस्ट २०१४ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नीस पेन्शनचा लाभ मिळावा यासाठी मुलाने सर्व कागदपत्रे तयार केली होती, केवळ वारस नोंद करुन त्याचा फेरफार नसल्याने पेन्शन सुरु होऊ शकली नव्हती. त्याने वारस नोंद करुन फेरफार मिळावा यासाठी तलाठी मुल्ला यांच्याकडे अर्ज केला होता. या नोंदीसाठी मुल्ला यांनी एक हजार रुपयांची लाच मागितली होती. पैसे दिल्याशिवाय काम होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलाने गुरुवारी सकाळी (दि. ११ डिसेंबर) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांनी तातडीने कारवाईसाठी पावले उचलली. कोरेगाव तहसील कार्यालयाच्या आवारातील सभागृहामध्ये सध्या सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण सुरु आहे. त्यामुळे बहुतांश तलाठी कोरेगावमध्ये काम करत आहेत. मुल्ला हीदेखील कोरेगावातच असल्याने पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली व तडजोडीअंती ८०० रुपयांची लाच तहसील कार्यालयानजिक असलेल्या एका हॉटेलच्या समोर घेताना मुल्ला हिला रंगेहाथ पकडले.दरम्यान मुल्ला हिच्या वडूज येथील निवासस्थानाची तपासणी करण्यास लाचलुचपतत विभागाने रात्री उशिरा सुरुवात केली. त्यासाठी तिच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडण्यात आले. (प्रतिनिधी)गुरुवार ठरतोय घातवारकोरेगावच्या महसूल विभागामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नेमकी गुरुवारी कारवाई केली आहे. यापूर्वीच्या तीन्ही कारवाया देखील गुरुवारीच झाल्याने महसूल खात्यासाठी गुरुवार घात वार ठरतोय की काय ? अशी चर्चा तहसील कार्यालय परिसरात सुरु होती. दोन वर्षांत चौथी कारवाईकोरेगाव तालुक्याच्या महसूल विभागामध्ये दोन वर्षामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौथी कारवाई केली आहे. यापूर्वी लिपिक प्रवीण कुंभार, वाठार स्टेशनचे मंडलाधिकारी कदम, सेतू कार्यालयातील अव्वल कारकून सिमंतीनी कदम, रेकॉर्ड रुमच्या मदतनीस आशालता जाधव यांना लाच स्वीकारताना अनुक्रमे रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी महिला तलाठी दिलशाद मुल्ला यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे महसूल कर्मचाऱ्यांसह तलाठ्यांचे धाबे दणाणले आहेत.
महिला तलाठी लाच घेताना जाळ्यात
By admin | Updated: December 11, 2014 23:55 IST