मोहन मस्कर-पाटील ल्ल साताराजिल्ह्यातील अनेक डोंगरपठारावर सुसाट वेगाने धावणारे वारे पवनचक्की कंपन्यांसाठी ‘कोटींची उड्डाण’ ठरले आहे. जिल्ह्यात पवनचक्की कंपन्यांनी वाऱ्याच्या माध्यमातून वीजनिर्मिती केली आणि ती राज्याला दिली म्हणून ‘महावितरण’ने त्यांना वर्षभरात ४७८ कोटी रुपये दिले आहेत. परिणामी धरणातील पाण्यापाठोपाठ आता सातारचे वारेही पवनचक्की कंपन्यांना अब्जाधीश बनविण्यास कारणीभूत ठरले आहे. जिल्ह्यात आजमितीस १८५३ पवनचक्की कार्यरत आहेत. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलेल्या कोयना धरणाने महाराष्ट्र प्रकाशमान केला. एकट्या कोयना धरणातून २000 मेगावॅट वीजनिर्मिती होते. कोयना धरणातील वीजनिर्मिती टप्प्याटप्प्याने वाढत गेली असलीतरी गेल्या सहा दशकात कोयना धरणाने ‘महावितरण’ला किती कोटी मिळवून दिले असतील, याची कल्पनाच न केलेली बरी. कोयना धरणापाठोपाठ आता सातारचा वाराही पवनचक्की कंपन्यांना कोट्यधीश बनविणारा ठरला आहे. याच वाऱ्याच्या वेगावर पवनचक्कींच्या माध्यमातून महावितरणला १४२४ मेगावॅट वीज मिळत आहे. सातारा जिल्ह्याचा बहुतांशी भाग डोंगराळ आहे. गणेशवाडी, कास, चाळकेवाडी, बामणोली, पाटण, चाळकेवाडी, ठोसेघर, चवणेश्वर येथे जगभरातील आंतरराष्ट्रीय, बहुराष्ट्रीय विंड मिल कंपन्यांनी पवनचक्की उभारल्या आहेत. काही पवनचक्क्या पुणे, मुबंई येथील नामांकित उद्योगसमूहांच्या आहेत. या डोंगरपठारावर १८५३ पवनचक्की असून येथे १४२४ मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. यातून १९00 दशलक्ष युनिट वीज महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीला मिळत असून त्याबदल्यात महावितरण संबंधित पवनचक्की कंपन्यांना पैसे देत आहे. यावर्षातील ही रक्कम ४७८ कोटी इतकी आहे.सह्याद्रीच्या रांगामुळे सातारा जिल्ह्याकडे नेहमीच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर कार्यरत पवनचक्की उद्योगाचे लक्ष गेले आहे. त्यातूनच प्रत्येक वर्षाला जिल्ह्यात सरासरी शंभरहून अधिक पवनचक्क्यांची उभारणी होत आहे. सर्वाधिक पवनचक्क्या पाटण आणि सातारा तालुक्यात उभारल्या आहेत. जावळी तालुक्यातही हे लोण पसरत आहे. गेल्या तीन ते चार वर्षांत आता माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्याच्या काही भागात पवनचक्की उभारणीला वेग आला आहे. त्यामुळे पवनचक्क्यांची संख्या वाढणार आहे. आगामी चार ते पाच वर्षांत तर हेच प्रमाण चार हजारच्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.जमिनीचे भाव भिडले गगनाला४सातारा जिल्ह्यात असणाऱ्या कास, बामणोली, चाळकेवाडी, डोंगरपठारावरील जमिनीला पूर्वी कोणी भाव द्यायलाही तयार नसायचे. मात्र, गेल्या दशकात येथील जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यास कारणीभूत पवनचक्की कंपन्याच आहेत, ही बाब कोणी नाकारत नाही. यातून काही दलालही निर्माण झाले. अनेकांनी एकच जागा चार ते पाच जणांना विकण्याचे प्रतापही केले आहेत. विशेष म्हणजे दलालांमध्ये सरकारी कर्मचारी, शिक्षक मंडळीही सहभागी आहे. ग्रामपंचायतींना ३२ कोटींचा कर पवनचक्की कंपन्यांनी ज्या परिसरात अथवा ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत पवनचक्की उभी केली आहे, त्या ठिकाणी असणाऱ्या ग्रामपंचायतीला २0१३ च्या शासन निर्णयाप्रमाणे कर देणे बंधनकारक आहे. मात्र, कोरेगाव, खटाव, कऱ्हाड, जावळी, सातारा, पाटण, वाई, महाबळेश्वर आणि माण या नऊ तालुक्यातील १६२0 पवनचक्की कंपन्या १२0४ ग्रामपंचायतींना करापोटी असणारी ३२ कोटी २२ लाख २१ हजार रुपये इतके देणे लागते.
वारा गाई गाणे...‘कोटींचे’ तराणे !
By admin | Updated: August 24, 2014 00:32 IST