लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकामच्या उत्तर विभागांतर्गत कार्यरत काही शाखा व कनिष्ठ अभियंत्यांच्या शैक्षणिक अर्हतेवरच एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने शंका उपस्थित केली आहे. यासाठी संबंधिताने विभागीय आयुक्तांनाच निवेदन देऊन अभियंत्यांची शैक्षणिक कागदपत्रे तपासणीची मागणीही केली आहे. यामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, जिल्हा परिषदेच्या बांधकामच्या उत्तर विभागांतर्गत अनेक शाखा व कनिष्ठ अभियंते कार्यरत आहेत. हे अभियंते बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, लघु पाटबंधारे विभागात कार्यरत आहेत. मात्र, काहींनी नोकरी व पदोन्नती मिळविताना बनावट शैक्षणिक कागदपत्रांचा वापर केल्याबाबत साताऱ्यातील एका माहिती कार्यकर्त्याने शंका उपस्थित केली आहे. या कार्यकर्त्याने माहिती अधिकारातही जिल्हा परिषदेतील बांधकामच्या उत्तर विभागातील अभियंत्यांची माहिती मागवली होती.
गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये माहिती मागविलेली. त्यानंतर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने विभागांना पत्रव्यवहार करुन शाखा व कनिष्ठ अभियंत्यांच्या शैक्षणिक अर्हता कागदपत्रांची माहिती देण्याबाबत सूचना केली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने टपालाद्वारे कागदपत्रांच्या सत्यप्रती माहिती अधिकार कार्यकर्त्याला मिळाल्या. मात्र, काही अभियंत्यांच्या शैक्षणिक कागदपत्रात विसंगती दिसून येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शैक्षणिक अर्हतेवरील शंका आणखी गडद होऊ लागली आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडेच निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.सातारा जिल्हा परिषदेतील बांधकामच्या उत्तर विभागांतर्गत असणाऱ्या शाखा व कनिष्ठ अभियंत्याच्या शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी करावी. तसेच यामधून सत्य बाहेर यावे, अशी अपेक्षाही या निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.
चौकट :
सत्य समोर यावे...
सातारा जिल्हा परिषदेला मोठा इतिहास आहे. जिल्हा परिषदेने विविध उपक्रम यशस्वी राबविले आहेत. तसेच विविध स्पर्धा आणि अभियानातही राज्य नव्हे देशात डंका वाजवला. शासनाचे पुरस्कार मिळविले. त्याच ठिकाणी चुकीचे काही झाले असेल तर खूपच धक्कादायक ठरणार आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांनीच यात लक्ष घालून शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करुन सत्य समोर आणावे, अशीच अपेक्षा माहिती अधिकार कार्यकर्त्याबरोबरच जिल्हावासीयांनी व्यक्त केली आहे.....................................................................