रशीद शेख -- औंध औंध, ता. खटाव येथे औंधमार्गे धावणाऱ्या अनेक एसटी गाड्यामागील काही वर्षांपासून हळूहळू बंद करण्यात आल्या असून, पूर्वीप्रमाणे सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करून भाविक, पर्यटक व विद्यार्थ्यांची गैरसोय थांबवावी, अशी मागणी औंध ग्रामस्थांकडून होत आहे.सध्या उन्हाळी सुटीचा हंगाम सुरू होत आहे. त्यामुळे औंधला येणाऱ्या भाविक व पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. भाविक व पर्यटक मोठ्या प्रमाणावर दाखल झाल्यानंतर औंधमध्ये व्यापारी, व्यावसायिक वर्गांची मोठी उलाढाल होत असते; परंतु मागील काही दिवसांपासून अनेक लांब पल्ल्याच्या एसटी बस बंद आहेत. एसटीने औंधला येणाऱ्या भाविक, पर्यटकांची सख्या लक्षणीय आहे. ‘गरिबांचा रथ’ म्हणून ओळखली जाणारी एसटीची संख्या औंधमार्गे वाढवावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.औंध येथे डोंगराच्या पायथ्याशी विश्रामगृह कॉलेजच्या समोर बसस्थानक बांधण्यात आले आहे. अनेक सोयी सुविधा औंधमध्ये उपलब्ध असताना देखील एसटी महामंडळाचे औंधवर लक्ष का नाही? असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.औंध हे ठिकाण पर्यटन व तीर्थक्षेत्राच्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातही प्रसिद्ध आहे. येणाऱ्या भाविकांची संख्या ही प्रचंड आहे. औंध येथून पुणे, मुंबई, कोल्हापूर, अहमदनगर, सांगली या ठिकाणी नोकरी, शिक्षण, व्यापारानिमित्त राहणाऱ्या व ये-जा करणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. परंतु औंधला येताना व औंधवरून जाताना एसटीच्या अनियमितपणामुळे मोठा मन:स्ताप प्रवाशांना होत आहे. वडूजच्या नवीन आगारप्रमुखांनी औंधवासीयांना न्याय द्यावा एवढीच अपेक्षा आहे.औंधसाठी लांब पल्ल्याच्या व कऱ्हाडला जाणाऱ्या एसटी बसेस लवकरच सुरू करण्याच्या विचारात आहोत. लवकरच औंधच्या बाबतीत चित्र बदललेले दिसेल. - प्रताप पाटील, आगारप्रमुख वडूज औंधला ये-जा करण्यासाठी एसटी नाहीतच, असे समीकरणच भाविक व पर्यटकांच्या मनात तयार झाले आहे. हे समीकरण एसटी विभागाने बदलावे. - हणमंतराव शिंदे, विश्वस्त, औंध शिक्षण मंडळ उन्हाळ्यात जर औंधला येणाऱ्या एसटीच्या फेऱ्या वाढविल्या नाहीत तर तीव्र आंदोलन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येईल.- राजेंद्र माने, माजी उपसरपंच, औंध एसटीमधून येणाऱ्या भाविक, पर्यटकांची संख्या एसटी नसल्यामुळे खूप कमी झाल्याने व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. - धनाजी आमले, आजी-माजी सैनिक संघटना
औंधला ‘गरीब रथ’ थांबेल का?
By admin | Updated: March 20, 2016 23:51 IST