सातारा : सातारा जिल्ह्यातील क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या विविध प्रश्नांवर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे शिक्षण तथा क्रीडा सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. नागपूर येथे त्यांच्या ‘रविभवन’ या निवासस्थानी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रश्नांची युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनील काळेकर, भाजपा, अजय परदेशी, तालुकाध्यक्ष लक्ष्मण पटेल यांनी माहिती दिली. जिल्ह्यातील विविध विद्यालये व महाविद्यालये आजही समस्यांच्या गर्तेत असून, अनेक शिक्षण संस्था या आजही नियमांची पायमल्ली करत आहेत. विद्यार्थ्यांकडून शालेय शुल्काच्या नावाखाली भरमसाठ पैसे घेऊनदेखील त्यांना योग्य त्या सुविधा दिल्या जात नाहीत. त्याचबरोबर शासकीय अनुदानात असलेल्या योजनांमध्ये देखील पारदर्शकता नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यापुरते मर्यादित असलेले राष्ट्रवादीच्या नेत्यांच्याच दबावाखाली जिल्हा प्रशासन काम करत असल्याचे दृश्य दिसत आहेत. राज्यांमध्ये सर्वसामान्य जनतेच्या विचारांचे सरकार आले आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाला आज देखील त्याची जाणीव झाली नसल्याने जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत ढिसाळ कारभार दिसून येत आहे. मग तो शालेय पोषण आहाराचा असेल, अथवा पालकांना विश्वासात न घेता अवास्तव फी वाढीचा प्रश्न असेल, फी भरण्यास उशीर झाला तर आकारण्यात आलेला दंड असेल व याच कारणासाठी विद्यार्थ्यांना भर उन्हात दिवसभर उभे करण्याचा प्रश्न असेल अशा विविध जिल्ह्यांतील प्रश्नांबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली.या संदर्भात शिक्षण मंत्री यांनी जिल्ह्यातील सर्व प्रश्नांबाबत गांभीर्याने विचार करून विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली. यावेळी युवा मोर्चा सातारा जिल्हा व सातारा शहर युवक मंडळाच्या वतीने सरस्वतीचे प्रतिमा भेट देऊन शिक्षण मंत्री तावडे यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
शैक्षणिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणार : तावडे
By admin | Updated: January 9, 2015 00:04 IST