सांगली : पैशासाठी पत्नीचा छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती गजानन रामचंद्र खंडागळे (वय ३५, रा. महावीर रेल्वे ब्रीजजवळ, कुपवाड रस्ता, सांगली) यास दोषी धरुन तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा व सत्रन्यायाधीश जी. एस. शेगावकर यांनी गुरुवारी हा निकाल दिला. तिसंगी (ता. कवठेमहांकाळ) येथील वंदना यांचा विवाह गजानन खंडागळेशी झाला होता. त्यांना शरयू (१२) व अर्चित (८) ही दोन मुले आहेत. गजाननला दारूचे व्यसन होते. गजानन हा त्याच्या भावासाठी झालेल्या शैक्षणिक खर्चाची रक्कम वंदनाने माहेरहून आणावी, अशी मागणी करीत होता. तसेच तिच्या आईने पवनचक्कीस विकलेल्या जमिनीतीन आलेल्या पैशामध्येही तो वाटणी मागत होता. या कारणावरून त्याने वंदनाचा शारीरिक व मानसिक छळ सुरू ठेवला होता. मुलांनाही तो मारहाण करायचा. त्याच्या छळास कंटाळून वंदनाने १७ मार्च २०१३ रोजी पेटवून घेऊन आत्महत्या केली होती. या खटल्यात सहायक जिल्हा सरकारी वकील सुरेश भोसले यांची नियुक्ती झाली होती. अॅड. भोसले यांनी अकरा साक्षीदार तपासले. यामध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक शरद जांभळे, मृत वंदनाचा भाऊ अधिकराव काशीद, आई बकुळा काशीद, शेजारची महिला सुरेखा कुलकर्णी, तपास अधिकारी शिल्पा दुथडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश खाडे व नेहा जाधव यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. गजाननला तीन वर्षे सक्तमजुरी, एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. (प्रतिनिधी)साक्षीदार फितूरवंदनाची मुलगी शरयू हिची साक्ष महत्त्वाची होती. मात्र ती फितूर झाली. तसेच पंच साक्षीदार ओंकार शाम जाधव व गुरुदत्त अशोक शेंडगे हेही फितूर झाले होते. वंदनाचा मृत्युपूर्व जबाब महत्त्वाचा ठरला.
पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी
By admin | Updated: November 5, 2015 23:54 IST