लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : मागील काही महिन्यांपासून सिलिंडरचे दर सतत वाढत असून पुन्हा २५ रुपयांनी टाकी महाग झाली आहे. त्यामुळे घरगुती सिलिंडर टाकीची किंमत ८९० रुपयांजवळ पोहोचली आहे. यामुळे सामान्यांचे जगणे महाग झाले असून फ्लॅटमध्येही चुली पेटवायच्या का ? असा सवाल उपस्थित होत आहे.
मागील सव्वा वर्षापासून कोरोना विषाणूचं संकट आहे. यामुळे अनेकांची कामे गेली. नोकरी मिळविताना अडचणी येत आहेत. अशातच गेल्या वर्षभरात इंधन तसेच गॅस सिलिंडरचे दर सतत वाढत चालले आहेत. यामुळे महागाईची फोडणी अधिकच बसू लागली आहे. विशेष करुन सर्वसामान्य कुटुंबाना याचा फटका अधिक प्रमाणात बसत चालला आहे. कारण, सध्यस्थितीत सामान्य कुटुंबाच्या घरातही गॅस आहे.
काही दिवसांपूर्वी सिलिंडर टाकीचा दर २५ रुपयांनी वाढवला होता. त्यानंतर पुन्हा २५ रुपयांची वाढ केली आहे. यामुळे टाकी ८९० रुपयांजवळ पोहोचलीय. साधारणपणे पाच माणसांच्या कुटुंबाला महिन्याला एक टाकी लागते. यावरुन दर महिन्याला ९०० रुपये टाकीवरच खर्च करावे लागणार आहेत.
मागील नऊ महिन्यांचा विचार करता घरगुती सिलिंडर टाकीचा दर ५९९ वरुन ८९० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मागीलवर्षी डिसेंबर महिन्यात १०० रुपयांनी वाढ झाली होती. त्यामुळे टाकीचा दर ५९९ वरुन ६९९ रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर सतत सिलिंडर टाकीचा दर वाढतच गेलेला आहे. आता तर प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला दरवाढ होणार आहे.
.....................................
प्रत्येक १ तारखेला दरवाढ निश्चित...
दिनांक दरवाढ सिलिंडरचे दर
१ डिसेंबर २० ६९९
१ जानेवारी १०० ७९९
१ फेब्रुवारी नाही ७९९
१ मार्च नाही ७९९
१ एप्रिल १५ ८१४
१ मे नाही ८१४
१ जून नाही ८१४
१ जुलै २५ ८३९
१ ऑगस्ट २५ ८६५
१ सप्टेंबर २५ ८९०
....................................................