दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ढेबेवाडी रुग्णालयात पाहणीसाठी आलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्यासमोरही या सुरक्षारक्षकांनी आपल्या अडचणींचा पाढा वाचला. तसेच त्याबाबत निवेदनही दिले. न्याय देण्याची मागणी त्यांनी डॉ. सुभाष चव्हाण यांच्याकडे केली आहे.
ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकांच्या थकीत पगाराचा प्रश्न सतत डोके वर काढत आहे. रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून सेवा बजावूनही कामाचा मोबदला मिळत नसेल तर आम्ही जगायचं कस, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. गत नऊ महिन्यांपासून त्यांचे पगार थकीत आहेत. त्यातच रुग्णालयास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी भेट दिली. त्यावेळी मछिंद्र वाझोलकर, पांडुरंग ढेब-पवार, राजाराम कदम यांनी त्यांना निवेदन देऊन अडचणींबाबत चर्चा केली.
यावेळी सुरक्षारक्षकांनी सांगितले की, दोन सुरक्षारक्षकांच्या पगारात आम्ही तिघेजण सेवा बजावत आहोत. हातावर पोट असणारांचे पगार दहा-दहा महिने थकीत ठेवून नेमके काय साधले जात आहे? न्याय मागितल्यानंतर एकाने दुसऱ्याकडे बोट दाखवायचे, असाच अनुभव आम्ही शासकीय यंत्रणेकडून घेत आहोत. खूप तगादा लावल्यावर दोन-तीन महिन्यांचा पगार पाठवला जातो. मागचा तसाच ‘पेंडिंग’ राहतो. अन्य ग्रामीण रुग्णालयाचे सुरक्षारक्षकही असाच अनुभव घेत आहेत. अनेकदा याबाबत निवेदने दिली. अधिकारी व मंत्र्यांना भेटलो; पण काहीही उपयोग झाला नाही. रात्रंदिवस आठ-आठ तास उभे राहून आम्ही सेवा बजावतोय. त्या बदल्यात हे कसले बक्षीस आम्हाला दिले जातेय. प्रत्येकजण जबाबदारी टोलवत असल्याने आमचा अक्षरश: चेंडू झाला आहे. आता तातडीने आमचा प्रश्न मार्गी लावला नाही तर दोनवेळचे खाणेही आमच्या कुटुंबाला मुश्कील होईल. तातडीने तोडगा न निघाल्यास लवकरच उपोषणाचे पाऊलही उचलणार असल्याचा इशारा सुरक्षारक्षकांनी दिला आहे.