लोकमत न्यूज नेटवर्क
औंध : पुसेगाव-म्हासुर्णे रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी कामे अपूर्णावस्थेत आहेत. औंधकडून चौकीचा आंबा, पुसेगावकडे जाताना जायगावच्या खिंडीतील तेवढाच अपूर्ण भाग का ठेवला आहे, याचे कोडे वाहनधारकांना उलगडत नाही. त्यामुळे तिथे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. पुसेगाव-म्हासुर्णे रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे चालले आहे. एकीकडे रस्त्याचे काम एकाच दिवसात करून जागतिक विक्रम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने जायगाव खिंडीतील काम पूर्ण करावे, अशी आर्त हाक वाहनधारक करू लागले आहेत.
पुसेगावपासून औंधकडे येताना एक-दोन पुलाची कामे सोडली तर रस्ता चांगला झाला आहे; मात्र जायगावच्या खिंडीत वाहनधारकांचे हाल होऊ लागले आहेत.
जायगाव खिंडीतील उंची ‘जैसे थे’ असल्याने दोन्ही बाजूने वाहने आलेली दिसत नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे, तसेच जायगावकडून औंधला येणारी वाहने रस्ता चांगला असल्याने भरधाव येतात; मात्र नवीन प्रवास करणारी वाहने जोरात आल्यानंतर खिंडीत खराब रस्ता असल्याने घसरून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सगळीकडचा रस्ता होत आहे; मात्र जायगावच्या खिंडीतील रस्त्याचे घोडे नेमके कुठे अडलंय, असा प्रश्न वाहनधारक विचारू लागले आहेत.
कोट..
संबंधित ठेकेदार व इतर शासकीय विभाग यांच्यातील काही तांत्रिक अडचणींमुळे जरी काम थांबले असले तरी खड्डे तत्काळ भरून घेण्याची गरज आहे. तसेच उंची कमी करण्याची आवश्यकता आहे. लवकर खड्डे भरून घ्यावे, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल.
-नवनाथ देशमुख, सरपंच, जायगाव.
२५औंध
फोटो: औंध-जायगाव रोडवरील याच खिंडीतील काम अपूर्ण राहिल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.(छाया : रशिद शेख)