लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : पाटी-पेन्सिल धरणारे हात जेव्हा भीक मागू लागतात. तेव्हा सारेच अवाक् होतायत. राजवाड्यावर भीक मागण्यासाठी मुलांचे आईवडील गाडीवरून मुलांना त्या ठिकाणी सोडत आहेत. ही भीक मागणारी मुले पाहून अनेकजण अवाक् होत आहेत.
साताऱ्याचे मुख्य ठिकाण असणाऱ्या राजवाड्यावरील चाैपाटीवर खवय्यांची गर्दी झालेली पाहायला मिळतेय. याच गर्दीमध्ये काही लहान मुले भीक मागताना दिसतायंत. या मुलांसोबत त्यांची आई किंवा छोटी बहीण दिसत आहे. चाैपाटीवरील खवय्यांकडे हात पसरून ही मुले भीक मागत आहेत. तेव्हा खवय्यांना दया येते. त्यांच्या हातावर दोन किंवा पाच रुपये ठेवत आहेत. या मुलांना ‘लोकमत’ने बोलतं केले तेव्हा ही मुले सकाळी ८ वाजता घर सोडतात. दिवसभर भीक मागून संध्याकाळी पुन्हा आठ वाजता घरी जातात. या मुलांच्या शहराजवळ झोपड्या आहेत. आई भीक मागायला सांगते, असं एका चिमुकल्यानं सांगितलं. शाळेत का जात नाही तर म्हणे शाळा कुठंय, असे उत्तर त्याचं होतं.
चाैकट : पोवइ नाका....
पोवइनाक्यावर दोन लहान मुले कारचालकाकडे पैसे मागत होते. कार चालकाने डोकावून पाहिले आणि मुलांच्या हातात काही पैसे ठेवले. सुटे पैसे भीक म्हणून मिळाल्यानंतर ही मुले पुन्हा दुसऱ्या कारकडे वळत होती. असं तासभर त्या ठिकाणी भीक मागणं त्या मुलांचं सुरू होतं.
चाैकट : राजवाडा
राजवाडा हे शहराचं मुख्य केंद्र आहे. या ठिकाणी लहान मुले भीक मागताना दिसतातच, पण त्यांच्यासोबत त्यांची आई सुद्धा दिसते. कडेवर लहान मूल घेऊन या मुलांची आई भीक मागते. कडेवरचं लहान मूल पाहून अनेकजण दया दाखवताना दिसले.
चाैकट : बालहक्क कोण मिळवून देणार...
खरं तर मुलांना भीक मागण्यास लावणे, हे चुकीचे आहे. हे त्यांच्या पालकांना समजले पाहिजे. त्या मुलांना बालहक्क मिळवून देण्यासाठी कागदोपत्री काम न करता शासनाने ग्राउंड लेवलला उतरून काम केलं पाहिजे. तरच ही मुले भीक न मागता शाळेत जातील.
सीताराम जाधव, सामाजिक कार्यकर्ते, सातारा
कोट : भीक मागणाऱ्या मुलांनी शिक्षणाची कास धरावी, यासाठी शासन एकीकडे प्रयत्न करत असले तरी अद्यापही शहरातून भीक मागणारी लहान मुले कमी झाले नाहीत. लहान वयातच या मुलांना त्यांचे आईवडील भीक मागायला लावतायत. यावर तातडीने अंकुश आणला पाहिजे.
प्रदीप पवार, सामाजिक कार्यकर्ते, यादोगोपाळ पेठ, सातारा