मसूर : कृष्णा नदीवरील कालगाव-पेरले पुलाच्या दक्षिण बाजूच्या रस्त्यासाठी पेरले, ता. कऱ्हाड येथील बारा शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्याचा आर्थिक मोबदला देण्यासाठी अधिकारी व शासनाची गेली अनेक वर्षांपासून टाळाटाळ सुरू असून, हा मोबदला १५ जुलैअखेर न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा पेरले येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.कृष्णा नदीवर कालगाव-पेरले पुलाचे काम ९५ टक्के झाले आहे. पेरले पुलाच्या दक्षिण बाजूकडील पूर्व-पश्चिम या बायपास रस्त्यासाठी तेथील शेतकऱ्यांनी गावठाणातील आपल्या हक्काच्या जमिनी दिल्या आहेत. शासनाने त्याचा ताबा घेतल्यानंतर पुलापासून बायपास रस्ताही झाला. पुलाचे काम पूर्ण झाल्यावर हाच बायपास रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणार आहे. या बायपास रस्त्यासाठी लाखोंचा निधी देण्यात आला; मात्र याच रस्त्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या जमिनी दिल्या त्यांना मात्र अद्याप आर्थिक मोबदला का मिळाला नाही? असा सवाल शेतकरी करीत आहे.याबाबत संबंधित शेतकऱ्यांंनी बांधकाम विभागाकडे वारंवार मागणी केली. मात्र, संंबंधित अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना १५ जुलैअखेर जमिनीचा मोबदला न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)पुलाचे काम दोन महिन्यांपासून ठप्प वाढीव निधीची आवश्यकता असून, तो मिळत नसलेच्या कारणावरून संबंधित पुलाचे कामही दोन महिन्यांपासून थांबले आहे. संबंधित कंत्राटदारही गाशा गुंडाळून परतीच्या मार्गावर आहे. दुर्लक्षितपणामुळे शासनाचे १३ कोटी पाण्यात जाण्याची शक्यता आहे. चांगल्या भरीव विकासकामाला निधीअभावी ब्रेक बसत असल्याने ग्रामस्थांमधून नाराजीही व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी जमिनीच्या मोबदल्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी केली. मात्र, अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.- यशवंत चव्हाण, शेतकरी, पेरले
जमिनी दिल्या..मोबदल्याचं काय?
By admin | Updated: July 6, 2015 00:19 IST