फलटण : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी फुलांनी सजवलेल्या एसटीमधून फलटण तालुक्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. यावेळी ठिकठिकाणी भाविकांनी रस्त्याच्या कडेने दर्शनासाठी गर्दी किती होती; मात्र एसटी कोठेही न थांबल्याने काही भाविकांनी एसटी बसवर पुष्पवृष्टी केली.
पंढरपूरच्या सावळ्या विठूरायाच्या ओढीने परंपरेने पंढरपूरला जाणाऱ्या श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका यंदाही कोरोनामुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थित शिवशाही बसने आळंदीतून पंढरपूरला मार्गस्थ झाल्या. सतरा दिवसांचा आजोळघरातील मुक्काम हलवून सोमवारी (दि. १९) रोजी सकाळी नऊच्या सुमारास चलपादुका मार्गस्थ झाल्या. आषाढातली पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातल्या सर्वांत मोठ्या सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानली जाते. पण यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे पायी आषाढी वारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आळंदी आणि देहूहून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पादुका एसटीद्वारे पंढरपूरला नेण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला होता. एसटीद्वारे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पंढरपूरकडे नेण्यात आल्या. फलटण तालुक्यात तरडगाव, काळज, बडेखान, सुरवडी, निंभोरे, वडजल, फलटण शहर, विडणी, पिंपरद, बरड, राजुरी या भागातील भाविक रस्त्याच्या कडेने दर्शनासाठी थांबले होते. त्यांनी लांबूनच मनोभावे माउलीचे दर्शन घेतले. काहींनी हात लावून तर काहींनी एसटी गेल्यानंतर गेलेल्या मार्गावरील माती मस्तकी लावून दर्शन घेतले. अनेकांनी एसटीवर ज्ञानेश्वर माउलींचा गजर करीत पुष्पवृष्टी केली.
सुरवडी येथील रॉयल पॅलेस येथे अल्पकाळ विश्रांतीसाठी सोहळा थांबला होता; मात्र तेथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कोणालाही एसटीपर्यंत पोहोचता आले नाही. फलटण तालुक्यात पालखी मार्गावर अत्यंत कडेकोट बंदोबस्त पोलिसांनी लावला होता. फलटण शहरात क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे भाविकांनी दर्शनासाठी रस्त्याच्या कडेने मोठी गर्दी केली होती; मात्र बस न थांबता पुढे मार्गस्थ झाली. यावेळी माउलीऽऽ माउलीऽऽ चा गजर भाविकांनी मोठ्या प्रमाणात केला होता. माउलीचे प्रत्यक्ष दर्शन घेता न आल्याने अनेक जण हळहळ व्यक्त करत होते.
चौकट
फलटण तालुक्यातून सोमवारी दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्यात प्रस्थान केले. पालखी सोहळा जात असताना वरुणराजाने हजेरी लावली. पिंप्रद येथे गुरुकुलचे विद्यार्थी फलटण ते पंढरपूर रस्त्याने पालखी सोहळा जात असताना माऊलीचा गजर करत रस्त्याच्या मध्यभागी आले. मात्र, पोलीसांनी त्यांना बाजुला केल्यामुळे पालखी मार्गात कोणताही अडथळा आला नाही. पालखी मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात पालखी सुखरुप सोलापूर जिल्ह्यात पोहचली.
फोटो २० सातारा-पालखी
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका सोमवारी फुलांनी सजविलेल्या एसटीने सातारा जिल्ह्यातून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. (छाया : नसीर शिकलगार)