खंडाळा : कोरोनाच्या संसर्गाने उच्चांक गाठलेला असताना दुसरीकडे पाणीटंचाईच्या झळांनाही नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. खंडाळा शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना पाणी कमी झाल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.
खंडाळा तालुक्यात दरवर्षी एप्रिल, मे व जून महिन्यात काही गावांतील नागरिकांना टंचाईच्या झळांना तोंड द्यावे लागते. मात्र या वर्षी दुर्गम वाड्या-वस्त्यांवरील गावात पाणीटंचाई अद्याप तरी जाणवू लागली नाही. मात्र खंडाळा शहरात पाणीपुरवठा विहिरीला कमी पडलेले पाणी तसेच शहरात पुरवठा पाइपलाइन बिघाड झाल्याने शहराच्या काही भागांत पाणीपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे कोरोनाशी मुकाबला करताना नगरपंचायत प्रशासनाला आता पाणीटंचाईच्या समस्येलाही तोंड द्यावे लागत आहे.
खंडाळा तालुक्यात उन्हाळा सुरू झाल्यापासून भूजल पातळी कमी होत चालली आहे. खंडाळा शहरात गेल्या महिनाभरापासून पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसभराच्या पाण्यासाठी चणचण भासत आहे. यासाठी आटापिटा करावा लागत आहे. नगरपंचायतीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.
फोटो दशरथ ननावरे यांनी मेल केला आहे.