फलटण : चार महिन्यांपासून सातत्याने छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओस एका अल्पवयीन मुलीने मला का त्रास देतोस? असे विचारित भर बसस्थानकात चप्पलने यथेच्छ प्रसाद दिल्याची घटना आज (गुरुवारी)सकाळी घडली.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, केदार रामचंद्र जाधव (वय २२, रा. चौधरवाडी, ता. फलटण) हा गेल्या चार महिन्यांपासून एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून वाईट हेतूने छेडछाड करीत होता. आज सकाळीही केदार जाधव फलटण बसस्थानकावर या मुलीची छेडछाड करत असताना या मुलीचा संयम सुटला. ती मुलगी मागे फिरून ‘मला का त्रास देतो?’ यावेळी जाधव याने मुलीला शिवीगाळ करून हात पिरगाळून मारहाण करू लागला. यावेळी मुलीने पायातील चप्पल काढून जाधव याची यथेच्छ धुलाई सुरू केली. त्याला चप्पलचा प्रसाद देण्याचा प्रकार सुमारे अर्धा तास सुरू होता. यावेळी बसस्थानकातील काही प्रवाशांनी पोलीस ठाण्यात फोन केला. शहर पोलिसांनी जाधव यास ताब्यात घेतले आहे. केदार जाधव याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तपास सहायक पोलीस निरीक्षक लांडे करीत आहेत. विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार वाढत असताना आज सडकसख्याहरीची धुलाई झाल्याची चर्चा बसस्थानकात दिवसभर होती. (प्रतिनिधी)
छेडछाड करणाऱ्याची युवतीकडून धुलाई
By admin | Updated: November 28, 2014 00:12 IST