सातारा : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी लाखो टन उसाचे गाळप करून सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केले नाही येत्या चार दिवसांत रक्कम जमा न केल्यास रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते ऊस कारखान्यांच्या गव्हाणीत उड्या मारतील, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचा ऊस तोडून नेल्यानंतर १४ दिवसाच्या आत एफआरपीची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करणे हे कारखान्यांसाठी बंधनकारक आहे. १४ दिवसांपेक्षा ज्यादा कालावधी होऊनदेखील उसाच्या बिलाच्या एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. कारखानदार शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत. प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असून, कायदेशीर कारवाई केली जात नाही.
२०२०-२०२१ या गळीत हंगामातील गाळप झालेल्या उसाची एफआरपीची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करण्यात यावी, ही रक्कम येत्या चार दिवसात शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाली नाही तर रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते साखर कारखान्यांच्या गव्हाणीत उड्या मारतील, असा इशारा रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. यावेळी रयत क्रांती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शंकर शिंदे, जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव आदी उपस्थित होते.