महाबळेश्वर : महाबळेश्वर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत २०१६ साली श्रद्धा उमेश रोकडे या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी ठेकेदारावर व कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून आपल्या कंत्राटी कामगार असलेल्या पतीस कोणतेही काम न करता पगार देण्यास भाग पाडले. हा प्रकार उघड झाल्यानंतर आता नगरसेविका आणि पती उमेश रोकडे या दोघांवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. याबाबत योगेश शिदे यांनी तक्रार दिली आहे.
योगेश शिंदे यांनी दिलेल्या तक्रारी अर्जामध्ये असे म्हटले आहे की, गेल्या चार वर्षांपासून फुकट पगार मिळवून लाखो रुपये लाटून नगरपालिकेची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. याप्रकरणी आपल्या पदाचा गैरवापर करणे आणि नगरपालिकेची मोठी आर्थिक फसवणूक करणे याप्रकरणी नगरसेविकेवर नगर परिषद व नगर पंचायत औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी. तसेच नगरसेविका श्रद्धा उमेश रोकडे यांना नगरसेविका म्हणून तत्काळ अपात्र घोषित करावे व त्यांचे पती उमेश (भिकन) रमेश रोकडे व श्रद्धा रोकडे या दोघा पती-पत्नीवर नगरपालिकेची फसवणूक केली म्हणून फौजदारी कारवाई करावी.
महाबळेश्वर नगरपालिकेत समोर आलेल्या या अजब प्रकरणामुळे सर्व कर्मचारी मात्र चक्रावून गेले आहेत. यावर मुख्याधिकारी काय कारवाई करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.