शेखर जाधव- वडूज वडूज बसस्थानकात विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. याच परिसरात स्वच्छातागृह असून अडचण नसून खोळंबा, अशा स्थितीत आहे. जिल्ह्यात बसस्थानके कात टाकण्याच्या स्थितीत असताना वडूजमध्ये त्याचा कोठेही मागमूस दिसत नाही. या सर्व बाबींसाठी संबंधित ठेकेदार का अधिकारी जबाबदार आहेत, असा प्रश्न पडत आहे. वर्षापूर्वी एस. टी. महामंडळाच्या बांधकाम विभागाच्या नियोजनानुसार वडूज बसस्थानक परिसराला संरक्षक भिंतीसाठी सहा लाख मंजूर झाले. काही महिन्यांत या कामाचा शुभारंभ देखील झाला. बसस्थानक परिसरातील संरक्षक भिंतीच्या कामासाठी पायाभरणी करून काम काही प्रमाणात पूर्ण करण्यात आले. मुबलक पाणीसाठा असताना देखील पाणी मारण्यात येत नसल्याच्या तोंडी तक्रारीही प्रवाशांनी व ग्रामस्थांनी आगार प्रमुखांकडे केल्या होत्या. कारण ही संरक्षक भिंत जास्तकाळ टिकू नये असाच हेतू होता की काय, असा प्रश्नही सर्वसामान्य वडूजकरांना पडलेला होता. या कामाकडे संबंधित ठेकेदाराचे नेमके दुर्लक्ष का, यासाठी वेळोवेळी गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारणा केली. दीड फूट उंच दगडी बांधकाम, त्यावर लोखंडी अँगल आणि त्यावर जुना पत्रा बसविण्यात येणार असल्याची माहिती या ठेकेदाराने दिली. जुना पत्रा काही अंशी गंजल्यामुळे नव्या पत्र्याची मागणी संबंधित विभागाकडे केली असल्याची माहितीही यावेळी त्या ठेकेदाराने दिली होती. त्यामुळे या कामासाठी लागणारे इतर साहित्य मागणीनुसार लवकरच मिळेल आणि मुदतीच्या आत हे काम पूर्ण होईल, अशी खात्री या ठेकेदाराने दिली होती. शाळा सुरू होण्यापूर्वी हे संरक्षक भिंतीचे काम होणे आवश्यक होते. कारण या कामासाठी होणारी दिरंगाई संभाव्य धोके निर्माण करू शकते. कामानिमत्त बाहेरगावी असणारे लोकांची वारंवार ये-जा सुरूच असते. एस.टी. ची वाट बघत बसणाऱ्या प्रवाशांना या बसस्थानक परिसराला परिपूर्ण नसलेल्या संरक्षक भिंतीमुळे नाहक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. शौचालय असूनही नियोजनशून्य काराभारामुळे आजअखेर त्याला कुलूप आहे. त्यामुळे प्रवाशांची अडचण होत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने तातडीने उर्वरित काम पूर्ण करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. (प्रतिनिधी)पाससाठी विद्यार्थी ताटकळत...वडूज बसस्थानक, आगारासाठी या शहरातील दात्यांनी कवडी मोल किमतींनी आपल्या जमिनी दिल्या. त्या शुद्ध हेतूने, काहीतरी चांगले होत आहे म्हणून. परंतु संबंधित प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गेली अनेक वर्षं झाली तरी पिण्याच्या पाण्याची ओरड, शौचालयांचा अभाव, स्वच्छतेची ओरड त्याचबरोबरीने एस. टी. पाससाठी असणाऱ्या खिडकीलगत विद्यार्थ्यांचे होणारे हाल. या सर्व बाबींकडे लक्ष वेधले असता तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या वडूज आगाराने याच कामात वाढीव निधीची मागणी करून या सर्व प्रमुख समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना उन्हाच्या काळात एस. टी. पास काढण्यासाठी खिडकीजवळ सुमारे चार-पाच तास ताटकळत उभे राहावे लागते.
वडूज वाढलं ; पण बसस्थानक आक्रमलं !
By admin | Updated: August 12, 2015 20:50 IST