वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील देवापूर वीजवितरण शाखा कार्यालयाअंतर्गत १९ गावे असले तरी अवघे तीनच वायरमन सध्या काम करीत आहेत. त्यामुळे ग्राहकांना सेवा देता-देता येथे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण येत आहे. खंडित वीजपुरवठा सुरळीत करायचा झाला किंवा गावागावांतील ग्राहकांच्या गैरसोयी दूर करायचे म्हटले तर चार-चार दिवस त्यांची कामे होत नाहीत. वीजवितरण कंपनीच्या या भोंगळ कारभारामुळे मात्र ग्राहकांना विनाकारण मन:स्ताप सहन करावा लागत आहे. देवापूर येथे सुमारे तीस वर्षांपूर्वी तत्कालीन राज्य विद्युत मंडळाचे शाखा कार्यालय सुरू झाले. या केंद्राअंतर्गत १९ गावे येतात. त्यामध्ये वरकुटे मलवडी, देवापूर, शिरताव, काळचौंडी, जांभुळणी, महाबळेश्वरवाडी, कुरणवाडी, वळई, पानवण, गंगोती, पळसावडे, चिलारवाडी, विरळी, लाडेवाडी आदी गावांचा समावेश आहे. वाड्या-वस्त्या वेगळ्याच आहेत. या केंद्राअंतर्गत ११ केव्हीचे सहा फिडर, आणि ३३ केव्हीचे तीन फिडर आहेत. यामधील वरकुटे मलवडी हे गाव सर्वात मोठे आहे. सुमारे सहा हजार लोकसंख्या एकट्या वरकुटे मलवडी गावाची आहे. या ठिकाणी मागील पाच वर्षे मुक्कामी वायरमन नाही. गावातील वीज गेल्यावर कोणाला तरी सांगून फ्यूज टाकावा लागत आहे. विजेचा घोटाळा असेल तर दोन-दोन दिवस तो निघत नाही. वरकुटे मलवडीसारख्या गावाची अशी स्थिती असताना छोट्या गावांची व वाड्या-वस्तीवरील ग्राहकांची अडचण तर अनेक दिवस न सुटणारी अशीच आहे. त्यामुळे अनेकवेळा मागणी करूनही या भागात अद्यापही पुरेसी वीज कर्मचारी संख्या मिळालेली नाही. (वार्ताहर) अकराच्या ठिकाणी तिघे...देवापूर येथे शाखा कार्यालय सुरू झाले तेव्हा अकरा वायरमनचा स्टाफ मंजूर असल्याचे सांगण्यात येत आहे. आज सुमारे तीस वर्षांनंतर ग्राहकांची संख्येत वाढ झाली तरी या पदात वाढ झाली नाही. उलट आहे त्यातील कर्मचारी कमी झाले आहेत. देवापूर कार्यालयांतर्गत भौगोलिक स्थिती पाहिली तर येथील गावे दूर व दुर्गम अशा ठिकाणी आहेत. आंदोलनाचा इशारा...वरकुटे मलवडी येथील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याने वीजकंपनीच्या विरोधात दहिवडी येथे आंदोलन केले होते. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामधील किती मागण्या मान्य झाल्या, हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे येथील वीज ग्राहकांनी आता वीज कंपनीच्या कारभाराबाबत पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.रिडिंग चुकीचे घेण्यात येते...सध्या मीटरवरील रिडिंग घेण्याचे काम ठेकेदारांमार्फत घेण्यात येत आहे. त्यामुळे अनेकवळा रिडिंग घेतले जात नाही. त्यामुळे ग्राहकांना जादा प्रमाणात बिल येत आहे. खरेतर मीटरवरील आकडा वेगळाच असतो आणि बिलावर रिडिंगचा आकडा दुसराच असतो. त्यामुळे ग्राहकांना बिल कमी करण्यासाठी दहिवडीपर्यंत हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे वसुलीवर परिणाम होत आहे. लाईनमनचे पद तीन वर्षांपासून रिक्तदेवापूर शाखा कार्यालयात दुय्यम अभियंता हे प्रमुख आहेत. त्यानंतर दुसरे महत्त्वाचे पद हे लाईनमनचे असते. या लाईनमनवर सर्वच कामे अवलंबून असतात. मात्र, हेच पद गेले तीन वर्षे झाले रिक्त आहे. त्यामुळे एका अधिकाऱ्यावर व तीन वायरमनवर सर्वच गावांचा व सर्व कामांचा भार पडत आहे. कर्मचारी येणार कधी ?येथील विजेच्या समस्यांबाबत वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर कर्मचारी देण्यात येतील. ग्राहकांना अडचणी येणार नाहीत, असे आश्वासन देण्यात येत आहे. आतापर्यंत अनेकवेळा हे झाले आहे. पण, जादा कर्मचारी मिळणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गावे एकोणीस अन् वायरमन तीनच!
By admin | Updated: December 26, 2014 00:51 IST