वडगाव हवेली : अतिवृष्टीमध्ये उद्ध्वस्त झालेले गाव पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी युवकमित्र बंडातात्या कऱ्हाडकर यांनी व्यसनमुक्त युवक संघाच्या माध्यमातून आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत शेरे (ता. कऱ्हाड) येथील माऊली ग्रामविकास प्रतिष्ठान सरसावले आहे.
चिपळूण व कोकण विभागात पूरग्रस्तांना मदतीसाठी सर्वजण धावत असताना शेरेतील माऊली प्रतिष्ठानने जावळी व महाबळेश्वर तालुक्यातील अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या गावांना मदतीचा हात दिला आहे. बंडातात्या कऱ्हाडकर यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष गावभेटीतून प्रतिष्ठानने बाधित गावांचा शोध घेतला. सलगपणे पाऊस पडल्याने त्या गावांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. विहिरी गाळाने भरल्या आहेत, रस्ते तुटले आहेत. अशास्थितीत त्या गावांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य व्यसनमुक्त युवक संघाच्या आवाहनाला प्रतिसाद देत हा उपक्रम राबविण्यात आला.
प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गावात मदतीसाठी ध्वनीक्षेपकाद्वारे आवाहन केले. तसेच घरोघरी जाऊन मदत गोळा केली. त्याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.