गुलाब पठाण-- किडगाव --सातारा शहरापासून वाई-पुणे दिशेला जाण्यासाठी पूर्वीच्या जुन्या हायवे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ये, ता. सातारा या गावाच्या हद्दीतील वेण्णा नदीवर ब्रिटिशकालीन पुलाला चक्क वड, पिंपळ या छोट्या झुडपांनी व्यापले असून, या पुलाची स्थिती समाधानकारक नाही. पूर्वी याच मार्गे सर्व वाहने पुणे-मुंबईकडे जात होती. सध्या पुणे, मुंबई, वाई, धावडशी या मार्गावर धावणाऱ्या सर्व प्रकारच्या एसटी बस व अन्य वाहतूक याच पुलावरून सुरू आहे. या वेण्णा नदीवरील पुलाने साधारणपणे २००७ रोजी आपली शंभरी पूर्ण केली. इंग्लंडहून या पुलाच्या शंभरी भरल्याबद्दल पत्र व्यवहार झाला. सध्या या पुलाची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. २००८ मध्ये या विभागाच्या वतीने या पुलाची डागडुजी करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून यावर लोखंडी अँगल टाकून व पुलाच्या सात मोहऱ्यांना आतून सिमेंट व गिलावा करण्यात आला आहे. मात्र, उभ्या दगडी खांबांसाठी कोणतीही डागडुजी झाली नाही. या पुलाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वड आणि पिंपळाच्या रोपट्यांनी वेढा दिला आहे. यामुळे पुलाचे दगड मोकळे होऊ लागले आहेत.या पुलाचे संरक्षण कठडे दगडी असून लोखंडी आहे. काही ठिकाणी ते तुटले असून, ते मजबूत नाहीत. या पुलावरील वळण धोकादायक असून, साताऱ्याकडून येणाऱ्या वाहनांना वळणाचा अंदाज आला नाही तर सरळ नदीपात्रात वाहने जातात. गतवर्षी या वळणावर संरक्षण कठडे बांधले आहेत. मात्र, आत्तापर्यंत अनेकांना या धोकादायक वळणावर आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे हे धोकादायक वळण काढण्याची मागणी होत आहे. दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे कण्हेर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला होता. यावेळी या पुलाच्यावरील कठड्याला पाणी लागले होते. नदीच्या पाण्यामुळे माती घसरत असून, त्याठिकाणी संरक्षण कठडा बांधण्याची आवश्यकता आहे. वर्ये येथील पुलाच्या धोकादायक वळणामुळे अनेकांना प्राणाशी मुकावे लागले आहे. हे धोकादायक वळण दूर करणे आवश्यक आहे. - राजेंद्र शेडगे, माजी सरपंच, किडगाव
‘वेण्णा’ ब्र्रिटिशकालीन पुलाला झुडपांचा वेढा
By admin | Updated: August 7, 2016 01:03 IST